For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोळाशे कोटीच्या हप्ता वसुलीचे काय? अमित शहा यांचे प्रतिपादन

06:22 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोळाशे कोटीच्या हप्ता वसुलीचे काय  अमित शहा यांचे प्रतिपादन
Advertisement

माहिती बाहेर आल्यानंतर विरोधकांना लपून बसावे लागेल :

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली आणि ती कोणाकडून मिळाली, याची सर्व माहिती लवकरच बाहेर येणार आहे. ही माहिती सार्वजनिक झाली की, विरोधकांना लपून बसावे लागेल. त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. एका टीव्ही वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 6 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून ही रक्कम मिळालेली आहे, असा आरोप विरोधक करीत आहेत. त्यासंबंधी शहा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या आरोपाला ते उत्तर देत होते. काँग्रेसलाही याच निवडणूक रोख्यांमधून 1,600 कोटीहून अधिक रक्कम मिळाली आहे. एवढ्या रकमेची हप्तावसुली काँग्रेसने कशी केली यासंबंधी आपण त्यांना विचारा. विरोधकांच्या आघाडीतील इतर पक्षांनाही मोठमोठ्या रकमा मिळाल्या आहेत. त्या त्यांनी कशा उपटल्या याची माहिती तेच देऊ शकतील. भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांची आघाडी यांना मिळालेली रक्कम जवळपास सारखीच आहे. त्यामुळे विरोधकांना भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. विरोधक भ्रम पसरवित आहेत, असा पलटवार अमित शहा यांनी केला.

न्यायालयाचा निर्णय शिरोधार्थ

निवडणूक रोखे योजनेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. तो भारताच्या सर्व नागरीकांवर बंधनकारक आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो. तथापि, ही योजना हा निवडणुकीतील काळे धन नाहीसे करण्याचा एक प्रयत्न होता. आता ही योजना नसल्याने पुन्हा राजकीय पक्ष किंवा उमेदवार काळ्या धनाचा आधार शोधू लागतील, अशी चिंता त्यांनी मुलाखतीत व्यक्त केली आहे.

काळ्या धनाचा मुक्त उपयोग

ही योजना येण्यापूर्वी निवडणुकांमध्ये बेहिशेबी काळ्या धनाचा मुक्तपणे उपयोग केला जात होता. म्हणूनच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या योजनेला विरोध केला होता. कारण त्यांचा काळ्या पैशावरच भर होता. 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 81 टक्के निवडणूक निधी रोख रकमेतून मिळाला होता. तो कोणी दिला याची माहितीही नव्हती. पण 2018 मध्ये रोख निधीचे प्रमाण 17 टक्क्यांपर्यंत आले होते. सर्वच राजकीय पक्षांना अज्ञात व्यक्तींकडून मिळणाऱ्या धनाच्या प्रमाणात मोठी घट या योजनेमुळे झाली होती. त्यामुळे आमचा प्रयत्न यशस्वी होत होता, अशीही टिप्पणी अमित शहा यांनी बुधवारी केली.

माहिती बाहेर येण्याची प्रतीक्षा

भारतीय जनता पक्ष आपल्या देणगीदारांची नावे घोषित करणार का, या प्रश्नावरही शहा यांनी सडेतोड उत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व माहिती बाहेर येणारच आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला किती आणि कोणाकडून निधी मिळाला हे सर्वांना समजणारच आहे. एकदा ही माहिती बाहेर येऊ द्या. मग विरोधकांची अवस्था कशी होते, हे समजेलच, असेही आव्हान त्यांनी दिले.

मोठ्या पक्षाला देणगीही जास्त

भारतीय जनता पक्ष हा 303 खासदारांचा भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाला निधी तुलनेने जास्त मिळाल्यास त्यात आश्चर्य नाही. तथापि, विरोधकांच्या आघाडीतील अनेक पक्षांना ते अत्यंत लहान आणि एका राज्यापुरतेच मर्यादित असूनही निधी प्रचंड प्रमाणात मिळाला आहे. विरोधक आता आमच्या विरोधात एकत्र लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या निधीचाही एकत्र विचार करणे आवश्यक आहे. तो निधी जवळपास आमच्याइतकाच आहे, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर पलटवार

ड निवडणूक रोख्यांसंबंधी विरोधकांचा कांगावा हास्यास्पद : अमित शहा

ड विरोधकांच्या आघाडीला निवडणूक रोख्यांमधून हजारो कोटींची रक्कम

ड भारतीय जनता पक्षाची आणि विरोधकांची रक्कम जवळपास समानच

Advertisement
Tags :

.