कोंकणी साहित्यिकांच्या कोत्या बुद्धिची की करावी तेवढी थोडीच!
मराठी निर्धार समितीचे गो. रा. ढवळीकर यांचे टीकास्त्र
पणजी : अर्नाकुलम येथे नुकत्याच पार पडलेल्या कोकणी साहित्य संमेलनातील मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा देण्यास विरोध करणारा ठराव अत्यंत निंदाजनक आहे, असे निवेदन करून मराठी राज्यभाषा समितीचे प्रमुख गो. रा. ढवळीकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आपल्या भाषेच्या वृद्धीसाठी, साहित्याच्या विकासासाठी सरकारची मदत मागणारे ठराव साहित्य संमेलनातून घेतले जातात. परंतु अशा प्रकारे दुसऱ्या भाषेने केलेल्या मागणीला विरोध करणारे ठराव मांडणाऱ्या आणि संमत करणाऱ्या साहित्यिकांच्या संकुचितच नव्हे तर कोत्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच, अशी खोचक टीपणी ढवळीकर यांनी केली आहे.
ढवळीकर पुढे म्हणाले की मनातून मराठीचा द्वेष करीत असताच, परंतु अशा प्रकारे साहित्य संमेलनात ठराव मांडून त्याचे प्रदर्शन करणे अत्यंत अशोभनीय आहे. मराठी राजभाषेला जाहीर विरोध करण्यापूर्वी मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीवरच आपण पोसले गेलो आहोत एवढे भान तरी या साहित्यिकांनी ठेवावयास हवे होते. अशाप्रकारे संमेलनात ठराव संमत करून मराठीला तिच्या न्याय्य हक्कापासून रोखता येईल, असे कोकणी साहित्यिकांना वाटत असेल तर तो त्यांचा निव्वळ भ्रम आहे. अखेर सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सल्लाही गो रा ढवळीकर यांनी दिला आहे.