सांगेत 10 कोटींची ‘व्हेल’ची उलटी जप्त
सांगे पोलिसांची सापळा रचून धडक कारवाई सावंतवाडी, गोव्यातील तिघांना अटक : औद्योगिक वसाहतीत होणार होता सौदा
सांगे : सांगे पोलिसांनी गुऊवारी रात्री दाबामळ, सांगे येथील औद्योगिक वसाहतीत छापा टाकून 10 कोटी किमतीची बेकायदा तस्करी केलेली व्हेल माशाची 5.7 किलो वजनाची उलटी जप्त केली. तसेच रत्नकांत कारापूरकर, वास्को, साईनाथ शेट, फोंडा आणि योगेश रेडकर, सावंतवाडी या तीन संशयितांना ताब्यात घेऊन नंतर चौकशीअंती अटक केली. त्याचबरोबर त्यांच्याकडील दोन गाड्याही जप्त केल्या आहेत.
सांगे पोलिसांना खबऱ्याकडून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सांगे पोलिसांनी आपली टीम तयार करून सापळा रचला. त्यांना कोणत्या वाहनातून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार याची माहितीही देण्यात आली होती. त्यानुसार संध्याकाळी 4.30 पासून पोलिस गस्तीवर होते. त्यांनी व्यवस्थित सापळा रचून सदर वाहने तपासली आणि पोलिसांना व्हेल माशाची उलटी सापडली. त्याची बाजारात 10 कोटी ऊ. इतकी किंमत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. सांगे पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे.
त्यानंतर पोलिसांनी पशुवैद्यकीय डॉक्टरला पाचारण करून पकडलेली उलटी व्हेल माशाची असल्याची खातरजमा करून घेतली. पोलिसांनी पंचनामा करून सदर व्हेल माशाची उलटी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी सांगे पोलिसांनी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. दाबामळ येथील शेळपे औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीजवळ व्हेल माशाच्या उलटीचा सौदा केला जाणार होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि संशयित मुद्देमालासह पोलिसांच्या तावडीत सापडले.
उच्च प्रतीच्या अत्तरासाठी वापर
कायद्यानुसार, व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणे बेकायदेशीर असून पोलिसांनी ताब्यात घेतलेली उलटी उच्च दर्जाची आहे आणि ती उच्च प्रतीचे अत्तर बनविण्यासाठी वापरण्यात येते, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळेच या उलटीची किंमत बाजारात प्रचंड मोठी असल्याचे सांगण्यात आले आहे.
सांगे वसाहतीची निवड का ?
दरम्यान, सांगेसारख्या दूरवच्या भागातील औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी सौदा करण्यासाठी येण्यामागे प्रयोजन काय, ही उलटी कोण खरेदी करणार होता, ती कुठे व कशासाठी जाणार होती याचा तपास पोलिस करत आहेत. व्हेल माशाच्या उलटीचा सौदा करण्यासाठी शेळपे औद्योगिक वसाहतीची निवड करण्यासंदर्भात संशय व्यक्त होत आहे. सांगे पोलिसाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या संशयितांना सांगे येथील न्यायालयासमोर हजर करून चार दिवसांचा रिमांड घेण्यात आलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.