For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 2.37 कोटींचे अंबरग्रीस जप्त; पणदूर येथे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश  2 37 कोटींचे अंबरग्रीस जप्त  पणदूर येथे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
Advertisement

कुडाळ : प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करणाऱ्या टोळीचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे शनिवारी सायंकाळी सापळा रचून पोलिसांनी 2 किलो 373 ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले. त्याची अंदाजे किंमत 2 कोटी 37 लाख 30 हजार रुपये आहे. या कारवाईत तस्करीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी एर्टिगा कार आणि होंडा युनिकॉर्न मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, चार संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 2 कोटी 46 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

शनिवारी सायंकाळी सुमारे 6.20 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. यावेळी काही व्यक्ती प्रतिबंधित अंबरग्रीस विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची विश्वसनीय माहिती पथकाला मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पंच व वनरक्षकांच्या उपस्थितीत पणदूर-कडावल मुख्य रस्त्यालगत कुलस्वामिनी एंटरप्रायझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कार्यालयाशेजारी सापळा रचण्यात आला.

काही वेळाने संशयास्पद हालचाली करणारी होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आणि मारुती सुझुकी एर्टिगा कार तेथे आढळून आली. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत वाहनांमधून आलेल्या चार जणांना ताब्यात घेतले.

Advertisement

ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे संकेत संतोष चव्हाण (26, सध्या रा. ओरोस-रवळनाथनगर, मूळ रा. निरूखे, ता. कुडाळ), महेश लक्ष्मण रेवणकर (35, सध्या रा. रत्नागिरी-कुवारबाव, मूळ रा. रेवंडी, ता. मालवण), अमेय पुंडलिक देसाई (31, रा. ओरोस-रवळनाथनगर, ता. कुडाळ) आणि अमित अरुण अणावकर (39, रा. अणाव, ता. कुडाळ) अशी आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत संशयितांकडे विक्रीच्या उद्देशाने 2 किलो 373 ग्रॅम अंबरग्रीस बाळगल्याचे आढळून आले. पोलिसांनी अंबरग्रीससह दोन्ही वाहने ताब्यात घेतली.

या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात चारही संशयितांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 मधील कलम 39,42,43,44,48 आणि 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अंबरग्रीसचा स्रोत आणि तस्करीमागील इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि विभागीय पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक अनिल हाडळ, उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार विल्सन डिसोजा, आशिष जामदार आणि अमर कांडर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Advertisement
Tags :

.