For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुराच्या पाण्यामुळे ओला चारा झाला खराब

11:04 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुराच्या पाण्यामुळे ओला चारा झाला खराब
Advertisement

दोन वेळच्या पुरामुळे चारा कुजल्याने दुग्ध उत्पादक-शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

Advertisement

वार्ताहर /उचगाव

मार्कंडेय नदीला चालू वर्षीच्या पावसाळी हंगामामध्ये दोनवेळा महापूर आल्याने नदीच्या दुतर्फा असलेल्या नदीकाठावरील जनावरांसाठी लागणारा ओला चारा, पुराच्या पाण्याखाली गेल्याने कुजून खराब झाला आहे. यामुळे चालूवर्षी चाऱ्याचा मोठा प्रश्न दुग्ध उत्पादक आणि शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शेतकरी तसेच दुग्ध व्यावसायिकांनी आता ओला चारा कोठून आणायचा आणि दुग्ध व्यवसाय कसा टिकवायचा? या चिंतेने हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement

बेळगावच्या पश्चिम भागातून वाहणारी मार्कंडेय नदी आणि या नदीच्या दुतर्फा पसरलेला ओल्या चाऱ्याचा मोठा भाग असून या ओल्या चाऱ्यावरतीच शेतकऱ्यांची तसेच दूध उत्पादकांच्या गाई, म्हशी अवलंबून असतात. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये सातत्याने दोनवेळा मार्कंडेय नदीला महापूर आल्याने नदीकाठचा संपूर्ण भाग हा पाण्याखाली गेला होता. आणि नदीकाठाला असलेला ओला चारा या पुराच्या पाण्याखाली गेल्याने तसेच नदीच्या पाण्यासोबत येणारा गाळ, माती याच्यावरती बसून संपूर्ण ओला चारा खराब झाल्याने शेतकरी तसेच दूध उत्पादकांचे चाऱ्यासाठी मोठे हाल होत आहेत.

ओल्या चाऱ्यासाठी प्रसिद्ध भाग

या परिसरातील राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, उचगाव, तुरमुरी, बाची, हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा व या संपूर्ण भागातून मार्कंडेय नदी वाहत असते. आणि या नदीच्या दुतर्फा नदीकाठाचा भरपूर भाग हा ओल्या चाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.

ओल्या चाऱ्यामुळे जनावरांच्या दूध वाढीवर परिणाम

सदर नदीला पूर आला नाहीतर सातत्याने तीन चारवेळा या ओल्या चाऱ्याची कापणी करून जनावरांना घालण्यात येतो. या ओल्या चाऱ्यावरतीच गाई, म्हशी दुधाचे प्रमाण अधिक वाढवतात. मात्र चालू वर्षीच्या हंगामात चाऱ्याचा प्रश्न बिकट निर्माण झाल्याने याचा परिणाम थेट दूध उत्पादनावरती झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना याची चिंता लागून राहिली आहे. चालूवर्षी पावसाळी हंगामात दोनवेळा महापूर आल्याने संपूर्ण हा भाग जलमय झाला. यामुळे ओला चारा मिळणे कठीण झाले आहे. शासन यावरती काही विचार करणार का? आणि शेतकरी, दुग्ध उत्पादकांना काही मदत मिळेल का, अशी विचारणा तमाम शेतकरी आणि दूध उत्पादकांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.