परदेशी ड्रग्ज माफियांनी पोखरला पश्चिम महाराष्ट्र
कराड :
‘एमडी’ (मेफेड्रॉन) हे ड्रग्ज पुरवणाऱ्या आणि त्याची नशा करणाऱ्या टोळीचा कराड उपविभागीय पोलिसांनी पर्दाफाश केला. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या 12 संशयितांची जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी झाडाझडती घेतली. दरम्यान पोलिसांनी पकडलेल्या बेंझामिन अॅना कोरू (आफ्रिकन खंड), सागना इमॅन्युअल (देश सेनेगल) या परदेशींकडे सातत्याने चौकशी केली. चौकशीत या संशयितांसह त्यांच्या साथीदारांनी ड्रग्ज कराडच नव्हे तर सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ड्रग्जचा पुरवठा केल्याचे निष्पन्न होत आहे. या दृष्टीने पोलीस खात्रीशीर तपास करत असून मंगळवारी पुन्हा चार पोलीस पथके तपासासाठी रवाना झाली आहेत.
कराड परिसरात ड्रग्जची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी तब्बल 29 दिवस पाळत ठेवून गोपनीय तपास सुरू ठेवला होता. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी ड्रग्ज प्रकरणाची तांत्रिक माहिती घेऊन त्यावर पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर यांच्याशी चर्चा केली. तांत्रिक माहितीत तथ्य आढळल्यानंतर समीर शेख यांनी वेगवान तपासाच्या सुचना दिल्या. त्यानुसार कराड उपविभागीय कार्यालय, कराड शहर पोलीस, उंब्रज पोलीस यांची 4 पथके तयार करण्यात आली. मुंबई, कोल्हापूर, पुणे या भागात तपास सुरू केला. यात राहूल अरूण बडे, समिर ऊर्फ सॅम जावेद शेख, तौसिब चाँदसो बारगिर, संतोष अशोक दोडमणी, फैज दिलावर मोमीन, अमित अशोक घरत, दिपक सुभाष सुर्यवंशी, बेंझामिन अॅना कोरू, रोहित प्रफुल्ल शहा, सागना इमॅन्युअल, नयन दिलीप मागाडे, प्रसाद सुनील देवरूखकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 37 ग्रॅम 1 लाख 14 हजार 350 रूपये किंमतीचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. त्यांच्याकडे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने चौकशी केली. विशेषत: पोलिसांनी मुंबईतून पकडलेल्या दोन परदेशी नागरिकांकडे कसून चौकशी केली.
- कराड पोलिसांचा दणका...पश्चिम महाराष्ट्र जागा
कराड शहरात पसरलेली मेफेड्रॉनची साखळी पोलिसांनी शोधत तब्बल 12 जणांना अटक केली. यात अटक केलेल्या सध्याच्या मुंबईस्थित परदेशी नागरिकांनासह अन्य एकाने केवळ कराडच नव्हे तर सांगली, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातही ड्रग्ज पुरवठा केल्याचे तपासात समोर येत आहे. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर याची खात्री करत आहेत. कराडसह अनेक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ड्रग्ज माफियांनी साखळी तयार केल्याचा संशय गृहित धरून पोलिसांनी तपासला सुरूवात केली आहे. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्ष राजू ताशिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, राजेश माळी, अशोक भापकर, रविंद्र भोरे, निलेश तारू, साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, दिपक वागवे, संतोष सपाटे, संताजी जाधव, आसिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, मयूर देशमुख, अनिकेत पवार, वैभव पवार, संग्राम भुताळे, राजाराम बाबर, अनिल स्वामी, संग्राम पाटील, मयूर थोरात, सायबरचे महेश पवार, यशवंत घाडगे यांच्यासह पोलीस पुन्हा तपासाला लागले आहेत.