वेस्ट इंडिजला आज चिंता झिम्बाब्वेच्या निर्धाराची
वृत्तसंस्था/ मुंबई
आज सोमवारी येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने येतील तेव्हा वेस्ट इंडिजला झिम्बाब्वेच्या दृढनिश्चयाबद्दल काळजी वाटेल. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी पहिल्या फेरीत आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते, परंतु त्यांच्यासमोर अधिक कठीण आव्हाने असल्याने त्यांचे काम अद्याप संपलेले नाही.
दोन वेळा विजेत्या वेस्ट इंडिजसाठी त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोनाची ही आणखी एक परीक्षा असेल. सलग चार विजयांसह वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषकापूर्वी स्वीकारलेले मालिका पराभव आपण कधीच मागे टाकले आहेत हे दाखवून दिले आहे. कॅरिबियन संघ विशेषत: इंग्लंडविऊद्धच्या विजयासह आणि खालच्या क्रमांकांवरील संघांना मागे टाकताना त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा एक ताकदवान चमू म्हणून उदयास आला आहे त्यांच्या शाई होपने (155 धावा, दोन अर्धशतके) आपला फॉर्म मिळवला आहे.
शिमरॉन हेटमायर (134) तिसऱ्या क्रमांकावर बरीच ताकद लावत आहे आणि जेसन होल्डर (7 बळी) आणि रोस्टन चेस या दोन खेळाडूंनी मौल्यवान कामगिरी केली आहे. शेरफेन रदरफोर्डची (126) स्फोटकता हा कॅरिबियन संघासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक आहे तसेच रोमारियो शेफर्डची (6 बळी) अष्टपैलू क्षमता देखील त्यांच्यापाशी आहे. शेफर्ड विशेषत: वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलच्या अनुभवावर अवलंबून असेल.
दुसरीकडे, झिम्बाब्वेने माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या आव्हानांना मोठ्या उत्साहाने तोंड दिले आहे. त्यांचा तऊण ब्रायन बेनेट दोन अर्धशतके आणि एकूण 175 धावांसह फलंदाजीत स्टार आहे आणि झिम्बाब्वेच्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. विंडिजचा संघ भारतात असताना सिकंदर रझा याच्या नेतृत्वाखालील संघाने त्यांचे सर्व लीग सामने श्रीलंकेच्या अधिक आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर खेळले आहेत हे उल्लेखनीय आहे.
वानखेडे स्टेडियमवर कमी अंतराची सीमारेषा आणि पाटा खेळपट्टीची शक्यता यामुळे वेस्ट इंडिज पॉवर-हिटिंगचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. कारण पॉवर-हिटिंग हे त्यांचे बलस्थान आहे. ही अशी गोष्ट आहे जी स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये समाविष्ट असलेल्या झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझारबानी (9 बळी) तसेच ब्रॅड इव्हान्स (8 बळी) यांच्यासमोर आव्हान उभे करेल.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.