हवाई निर्बंधांमुळे विंडीज संघाचे प्रस्थान लांबणीवर
वृत्तसंस्था, कोलकाता
सुरक्षेच्या कारणास्तव आखाती प्रदेशातील आंतरराष्ट्रीय हवाई निर्बंधामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे भारतातून प्रस्थान लांबणीवर पडले आहे, अशी माहिती क्रिकेट वेस्ट इंडिजने दिली.
एका अधिकृत निवेदनात सीडब्ल्यूआयने म्हटले आहे की, हे निर्बंध आखाती प्रदेशातील लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या सुरक्षा धोक्यांचा थेट परिणाम आहेत. ज्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उ•ाण मार्गावर परिणाम झाला आहे आणि विमान कंपन्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव नियोजनानुसार सेवा समायोजित करण्याची आवश्यकता आहे. बोर्डाने आश्वासन दिले की, खेळाडू प्रशिक्षक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. संघ आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी शक्य तितक्या लवकर सुरक्षित प्रवास व्यवस्था करण्यासाठी सीडब्ल्यूआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी), संबंधित सरकारी अधिकारी आणि एअरलाईन भागीदारांसोबत जवळून काम करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
सध्या वेस्ट इंडिज संघ भारतात सुरक्षित असून ते परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. प्रवास योजना निश्चित झाल्यानंतर चाहते आणि भागधारकांना त्याची माहिती दिली जाणार आहे. लीग टप्प्यात अपराजित राहूनही कॅरिबीयन संघ सुपर एटमध्ये अपयशी ठरला आणि उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही.