कसोटी मालिकेसाठी विंडीज संघ जाहीर
जोशुआ बिशपला संघात पहिल्यांदाच संधी, अल्झारी जोसेफला डच्चू
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत यजमान विंडीज आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका येत्या शनिवारपासून विंडीजमध्ये खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी 15 सदस्यांचा विंडीजचा संघ जाहीर करण्यात आला असून रॉस्टन चेसकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज जोशुआ बिशपला पहिल्यांदाच कसोटी संघात संधी मिळाली असून वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला पाकमध्ये जाण्यास नकार दिल्याने त्याला वगळण्यात आले आहे.
अलिकडेच झालेल्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गतमधील यापूर्वीच्या मालिकांमध्ये अल्झारी जोसेफची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली होती. पण काही वैयक्तिक समस्येमुळे तो या मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे विंडीजच्या प्रवक्त्याने सांगितले. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी करून फिरकी गोलंदाज बिशपने निवड समितीचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतल्याने त्याला या मालिकेसाठी पहिल्यांदाच संघात संधी मिळाली आहे. या मालिकेसाठी कर्क मॅपेंझीचे विंडीज संघात पुनरागमन झाले आहे. फिरकी गोलंदाज बिशपने चालु वर्षीच्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामात 25 सामन्यात 119 गडी बाद केल्याने त्याला या मालिकेसाठी निवडण्यात आले आहे. वॉरीकेनकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. मात्र वेगवान गोलंदाज फिलिपला वगळण्यात आले आहे. विंडीज संघाने अलिकडेच लंकेविरुद्धची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली असून आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप गुणतक्त्यात हा संघ आठव्या स्थानावर आहे.
विंडीज संघ : रॉस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारीकेन (उपकर्णधार), बिशप, चंद्रपॉल, जोशुआ दा सिल्वा, जस्टीन ग्रिव्स, हॉज, शाय होप, अमिर जंगू, शमार जोसेफ, ब्रेंडॉन किंग, कर्क मॅकेंझी, किमो पॉल, केमर रॉच आणि जेडेन सील्स.