विंडीजचा लंकेवर डावाने दणदणीत विजय
केमार रॉचचे कसोटीतील 300 बळी, अमिर जंगू-रॉस्टन चेस यांची विक्रमी 401 धावांची भागिदारी
वृत्तसंस्था, नॉर्थ साऊंड (अॅन्टीग्वा)
श्रीलंकेचा संघ सध्या विंडीजच्या दौऱ्यावर असून उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान विंडीजने लंकेचा खेळाच्या चौथ्याच दिवशी एक डाव आणि 217 धावांनी दणदणीत पराभव करत 1-0 अशी आघाडी मिळविली. या सामन्यात विंडीजचा वेगवान गोलंदाज केमार रॉचने कसोटी क्रिकेटमधील 300 बळींचा टप्पा ओलांडला. तर अमिर जंगू आणि कर्णधार रॉस्टन चेस यांनी सहाव्या गड्यासाठी 401 धावांची विक्रमी भागिदारी केली. द्विशतक नोंदवणाऱ्या विंडीजच्या अमिर जंगूला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या पहिल्या कसोटीत लंकेचा पहिला डाव 308 धावांत आटोपला. लंकेच्या डावात कर्णधार धनंजय डिसिल्वाने शानदार शतक (120) तर दिनेश चंडीमलने अर्धशतक (54) झळकविले. दिनुशाने 43 तर निशान मधुश्काने 23 धावा केल्या. रत्नायकेने 3 चौकारांसह 27 धावांचे योगदान दिले. विंडीजतर्फे ग्रिव्सने 3 तर केमार रॉच, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ यांनी प्रत्येकी 2 तसेच सील्सने 1 गडी बाद केला.
त्यानंतर विंडीजने दमदार फलंदाजी करत आपला पहिला डाव 9 बाद 626 धावांवर घोषित केला. विंडीजच्या डावामध्ये अमिर जंगूने 373 चेंडूत 3 षटकार आणि 19 चौकारांसह 233 धावा झोडपल्या. तर कर्णधार रॉस्टन चेसने 324 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह 194 धावांची खेळी केली. या जोडीने कसोटी क्रिकेटमधील सहाव्या गड्यासाठी 401 धावांची विक्रमी भागिदारी नोंदविली. यापूर्वी म्हणजे 2016 साली द. आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि बेअरस्टो या जोडीने 399 धावांची विक्रमी भागिदारी केली होती. पण हा विक्रम जंगू आणि चेस यांनी मोडीत काढला. कर्णधार चेसने कसोटीतील आपले सहावे शतक झळकविले. तब्बल 7 वर्षानंतर त्याचे हे कसोटीतील पहिले शतक आहे. कसोटी क्रिकेटमधील चेसची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
विंडीजने 5 बाद 271 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. जंगू आणि चेस यांनी खेळाची दोन सत्रे पूर्णपणे खेळून काढली. जंगूची ही दुसरी कसोटी आहे. त्याने 342 चेंडूत आपले द्विशतक नोंदविताना 1 षटकार आणि 17 चौकार ठोकले. 160.5 षटकांत विंडीजने आपला डाव 9 बाद 626 धावांवर घोषित करून लंकेवर 318 धावांची आघाडी घेतली. लंकेतर्फे रत्नायकेने 124 धावांत 5 तर दिनुशा आणि असिता फर्नांडो यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
लंकेने 1 बाद 15 या धावसंख्येवरुन दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि विंडीजच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा दुसरा डाव 31.2 षटकांत 101 धावांत आटोपला. लंकेच्या डावामध्ये केवळ दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. चंडीमलने 5 चौकारांसह 43 तर दिनुशाने 3 चौकारांसह नाबाद 12 धावा केल्या. विंडीजतर्फे रॉचने 51 धावांत 4 तर सील्सने 3, शमार जोसेफने 2 आणि अल्झारी जोसेफने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: लंका प. डाव सर्वबाद 308, विंडीज प. डाव 9 बाद 626 डाव घोषित, (अमिर जंगू 233, रॉस्टन चेस 194, किंग 31, कॅम्पबेल 39, डिसिल्वा 20, अल्झारी जोसेफ 21, शमार जोसेफ नाबाद 17, अवांतर 52, रत्नायके 5-124, दिनुशा व असिता फर्नांडो प्रत्येकी 2 बळी), श्रीलंका दु. डाव 31.2 षटकांत सर्वबाद 101 (चंडीमल 43, दिनुशा नाबाद 12, अवांतर 11, रॉच 4-51, सील्स 3-14, शमार जोसेफ 2-19, अल्झारी जोसेफ 1-11).