पहिल्या कसोटीवर विंडीजचे वर्चस्व
मोमीनुल हक, जाकर अली यांची अर्धशतके, अल्झारी जोसेफ, सील्सची प्रभावी गोलंदाजी
वृत्तसंस्था / नॉर्थ साऊंड (अॅन्टीग्वा)
येथे सुरू असलेल्या बांगला देश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळाच्या तिसऱ्या दिवशी यजमान विंडीजची स्थिती अधिक भक्कम झाली आहे. या सामन्यात विंडीजने 450 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर बांगलादेशची पहिल्या डावात स्थिती 9 बाद 269 अशी झाली आहे. बांगलादेशचा संघ अद्याप 181 धावांनी पिछाडीवर आहे. बांगलादेशतर्फे मोमीनुल हक्क आणि जाकर अली यांनी अर्धशतके नोंदविली.
या सामन्यात विंडीजने आपला पहिला डाव 9 बाद 450 धावांवर घोषित केला. त्यानंतर बांगलादेशने 2 बाद 40 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. विंडीजच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. बांगलादेश संघातील मोमीनुल हक्कने 116 चेंडूत 3 चौकारांसह 50 तर लिटॉन दासने 76 चेंडूत 3 चौकारांसह 40, जाकर अलीने 89 चेंडूत 4 चौकारांसह 53 धावा झळकविल्या. ताजुल इस्लामने 3 चौकारासह 25, झाकीर हसनने 3 चौकारांसह 15, शहदात हुसेनने 1 चौकारासह 18, कर्णधार मेहदी हसन मिराजने 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. उपाहारावेळी बांगलादेशने 3 बाद 105 धावांपर्यंत मजल मारली होती. तर चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्राअखेर बांगलादेशने 5 बाद 165 धावा जमविल्या होत्या. विंडीजतर्फे अल्झारी जोसेफने 69 धावांत 3 तर सिलेस आणि ग्रिव्हेस यांनी प्रत्येकी 2, रॉच व शमार जोसेफ यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून बांगलादेशच्या तुलनेत विंडीजचे पारडे निश्चितच जड वाटते.
संक्षिप्त धावफलक: विंडीज प. डाव 144.1 षटकात 9 बाद 450 डाव घोषित, बांगलादेश प. डाव 98 षटकात 9 बाद 269 (मोमीनुल हक्क 50, जाकर अली 53, लिटॉन दास 40, ताजुल इस्लाम 25, मेहदीहसन मिराज 23, तस्कीन अहम्मद खेळत आहे 11, झाकीर हसन 15, शहदात हुसेन 18, अवांतर 16, अल्झारी जोसेफ 3-69, सिलेस आणि ग्रिव्हेस प्रत्येकी 2 बळी, रॉच व शमार जोसेफ प्रत्येकी 1 बळी)