विंडीजच्या डरेन सॅमीला दंड
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
येथे नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत विंडीजचे प्रशिक्षक डरेन सॅमीला बेशिस्त वर्तनाच्या कारणावरुन दंड करण्यात आला. या सामन्यामध्ये प्रशिक्षक सॅमीने टीव्ही पंचावर टीका केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
या सामन्यासाठी अॅड्रीयन होल्डस्टॉक हे टीव्ही पंच म्हणून कार्यरत होते. या सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत प्रशिक्षक सॅमीने डीआरएस निर्णयामध्ये सातत्य नसल्याचा आरोप केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजाविरुद्ध दोन वेळा झेलबादच्या निकालासाठी डीआरएसचा वापर करण्यात आला होता. पण या निर्णयाने ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला नाबाद ठरविले. तर अशाच पद्धतीच्या निर्णयामध्ये विंडीजचा यष्टीरक्षक आणि फलंदाज शाय हॉपला बाद म्हणून घोषित करण्यात आले. या दोन निर्णयामध्ये खूपच तफावत असल्याची टीका डरेन सॅमीने उघडपणे केली. यानंतर सॅमीला शिस्तपालन समितीने 15 टक्के दंड जाहीर केला.