वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर 107 धावांनी दणदणीत विजय
सामनावीर हेटमायरची 34 चेंडूत 85 धावांची खेळी : विंडीजच्या विजयाने टीम इंडियाचे गणित बिघडले
वृत्तसंस्था/ मुंबई
वेस्ट इंडिज संघाने चौकार, षटकारांची आतषबाजी करत वानखेडे स्टेडियमवर झिम्बाब्वेवर 107 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि नेट रनरेटसह अव्वलस्थान पटकावले आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 254 धावांचा डोंगर उभारला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव 147 धावांतच संपुष्टात आला. विशेष म्हणजे, यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे तर टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. ब्रायन बेनेट 5 धावा करुन बाद झाला. कर्णधार सिकंदर रझा 27 धावा करुन माघारी परतला. ब्रॅड इवान्सने 21 चेंडूत 5 षटकार, 2 चौकारांसह सर्वाधिक 43 धावा करत झिम्बाब्वेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण दुसरीकडे झिम्बाब्वेच्या विकेट नियमित अंतराने पडत गेल्या. यामुळे झिम्बाब्वेचा संघ 17.4 षटकांत 147 धावांवर ऑलआऊट झाला. इवान्स वगळता इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केल्याने त्यांना पहिल्याच लढतीत 107 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
विंडीजचा दणकेबाज विजय
तत्पूर्वी, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि विंडीजचा संघ फलंदाजीसाठी उतरला. ऐतिहासिक वानखेडेवर विंडीजच्या फलंदाजांनी 19 षटकार आणि 17 चौकारांची आतषबाजी करत यंदाच्या विश्वचषकातील 6 बाद 254 अशी सर्वोच्च धावसंख्या उभी केली. ब्रँडन किंग आणि कर्णधार शाय होप यांनी डावाची सुरुवात केली. पण ब्रँडनला तिसऱ्या षटकात रिचर्ड एन्गारावाने 9 धावांवरच माघारी धाडले. यानंतर शिमरॉन हेटमायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमण केले. यादरम्यान शाय होपचा (14) अफलातून झेल ब्रायन बेनेटने ब्रॅड इवान्सच्या गोलंदाजीवर घेतला. वादळी खेळी करणाऱ्या हेटमायरला रोव्हमन पॉवेलची साथ मिळाली.
हेटमायरचे 19 चेंडूत जलद अर्धशतक
हेटमायर आक्रमण करत असताना पॉवेलने त्याला भक्कम साथ दिली. यादरम्यान हेटमायरने 19 चेंडूतच अर्धशतक केले, हे वेस्ट इंडिजसाठीचे टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात कमी चेंडूत केलेले अर्धशतक ठरले. यादरम्यान पॉवेलने आणि त्याने शतकी भागीदारीही पूर्ण केली. 15 षटकांच्या आतच वेस्ट इंडिजने 175 धावांचा टप्पा पार केला होता. पॉवेलने 29 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र 15 व्या षटकात अखेर ग्रॅमी क्रिमरने शिमरॉन हेटमायरचे वादळ रोखले. हेटमायरने 34 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांसह 85 धावांची खेळी केली. पॉवेलने 35 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारासह 59 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर रुदरफोर्डने अवघ्या 13 चेंडूत नाबाद 31 तर शेफर्डने 10 चेंडूत 3 षटकारासह 21 धावा फटकावल्या. या जोरावर विंडीजने 6 बाद 254 धावांचा डोंगर उभा केला.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज 20 षटकांत 6 बाद 254 (हेटमायर 85, पॉवेल 59, रुदरफोर्ड नाबाद 31, शेफर्ड 21, एन्गारावा आणि मुझाराबानी प्रत्येकी 2 बळी)
झिम्बाब्वे 17.4 षटकांत सर्वबाद 147 (मेयर्स 28, इवान्स 43, सिकंदर रझा 27, अकिल होसेन 28 धावांत 3 बळी, गुडाकेश मोती 28 धावांत 4 बळी).
टीम इंडियाच्या अडचणीत वाढ
झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर वेस्ट इंडिजने ग्रुप 1 मध्ये 2 गुणांसह आणि नेट रनरेट 5.350 सह पहिले स्थान पटकावले आहे. तर, दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका असून त्यांच्याकडे 2 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट +3.800, भारताचा नेट रनरेट -3.800 आणि झिम्बाब्वेचा नेट रनरेट हा -5.350 आहे.