For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीजचा पाकवर 120 धावांनी विजय

06:30 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
विंडीजचा पाकवर 120 धावांनी विजय
Advertisement

कसोटी मालिका बरोबरीत, सामन्यात 9 बळी मिळविणाऱ्या विंडीजच्या जोमेल वेरिकेनला दुहेरी मुकुट

Advertisement

वृत्तसंस्था/ मुल्तान

यजमान पाकिस्तान आणि विंडीज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील येथे सोमवारी विंडीजने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा तिसऱ्या दिवशी 120 धावांनी दणदणीत पराभव केला. विंडीजच्या अष्टपैल्यू जोमेल वेरिकेनला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी मुकुट मिळाला. वेरिकेनने या दुसऱ्या सामन्यात 70 धावांत 9 गडी बाद केले तर फलंदाजीत त्याने नाबाद 36 धावा जमविल्या. या मालिकेमध्ये वेरिकेनने एकूण 19 गडी बाद केले असून फलंदाजीत 85 धावां केल्या असल्याने त्याने दुहेरी मुकुट मिळविला.

Advertisement

या मालिकेतील दोन्ही सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. पहिली कसोटी तिसऱ्या दिवशी समाप्त झाली होती. तर दुसऱ्या कसोटीत त्याची पुनरावृत्ती झाली. पाक संघाकडे नौमन अली आणि साझिद खान या प्रमुख गोलंदाजांच्या जोरावर त्यांनी पहिली कसोटी जिंकली होती. पण दुसऱ्या सामन्यात विंडीजचा वेरिकेन पाकच्या गोलंदाजांच्या तुलनेत अधिक वरचढ ठरला.

या दुसऱ्या कसोटीत विंडीजचा पहिला डाव 163 धावांत आटोपल्यानंतर पाकने पहिल्या डावात 154 धावा जमविल्याने विंडीजने 9 धावांची नाममात्र आघाडी मिळवली होती. पाकच्या नौमन अलीने 6 गडी तर साजिद खानने 2 बळी घेतले होते. पाकच्या डावामध्ये विंडीजच्या वेरिकेनने 4 तर गुदाकेश मोतीने 3 आणि रॉचने 2 गडी बाद केले होते. खेळाच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे पहिला डाव समाप्त झाले होते.

रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी विंडीजने आपल्या दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. आणि त्यांचा दुसरा डाव 66.1 षटकात 244 धावांत आटोपल्याने पाकला निर्णायक विजयासाठी 254 धावांचे आव्हान मिळाले. कर्णधार ब्रेथवेटने 74 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 52 तर अमीर जंगुने 52 चेंडूत 3 चौकारांसह 30, इमलेचने 57 चेंडूत 1 चौकारासह 35, सिंक्लेयरने 2 चौकारांसह 28, हॉजने 1 चौकारासह 15 तर मोती आणि वेरिकेन यांनी प्रत्येकी 18 धावांचे योगदान दिले. पाकतर्फे नौमन अलीने 80 धावांत 4 तर साजिद खानने 76 धावांत 4 तसेच कासिफ अली आणि अब्रार अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात नौमन अलीने 10 गडी बाद केले. पण त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही.

पाकला विजयासाठी 254 धावांची गरज होती. पण विंडीजच्या भेदक गोलंदाजसमोर त्यांना हे आव्हान पेलवले नाही. पाकने रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर 4 बाद 76 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन पाकने सोमवारी खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 7 गडी 57 धावांत बाद झाले. पाकच्या दुसऱ्या डावात बाबर आझमने 67 चेंडूत 2 चौकारांसह 31, कमरान गुलामने 2 चौकारांसह 19, सौद शकिलने 1 चौकारासह 13, मोहम्मद रिझवानने 1 चौकारासह 25, सलमान आगाने 15 धावा जमविल्या. विंडीजच्या वेरिकेनने 27 धावांत 5 तर मोतीने 35 धावांत 2 आणि सिंक्लेयरने 61 धावांत 3 गडी बाद केले. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली गेली होती.

विंडीज संघाने तब्बल 34 वर्षांनंतर पाकच्या भूमीवर कसोटी विजय मिळवला आहे. 1990 साली विंडीजने आपला शेवटचा पाक दौरा केला होता आणि फैसलाबाद येथे झालेल्या कसोटीत त्यांनी पाकचा 7 गड्यांनी पराभव केला होता. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात पाकला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. तर विंडीज आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांनी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून त्यांचा सामना जून महिन्यात लॉर्डस् मैदानावर खेळविला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक - विंडीज प. डाव 41.1 षटकात सर्वबाद 163, पाक प. डाव 47 षटकात सर्वबाद 154, विंडीज दु. डाव 66.1 षटकात सर्वबाद 244 (ब्रेथवेट 52, जंगू 30, हॉज 15, इमलेज 35, सिंक्लेयर 28, मोती 18, वेरिकेन 18, अवांतर 21, नौमन अली 4-80, साजिद खान 4-76, कासिफ अली व अब्रार अहमद प्रत्येकी 1 बळी), पाक दु. डाव 44 षटकात सर्वबाद 133 (बाबर आझम 31, कमरान गुलाम 19, सौद शकिल 13, मोहम्मद रिझवान 25, सलमान आगा 15, अवांतर 12, वेरिकेन 5-27, सिंक्लेयर 3-61, मोती 2-35).

Advertisement
Tags :

.