पश्चिम बंगालचे मंत्री साहा यांचे निधन
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालचे अन्नप्रक्रिया राज्यमंत्री सुब्रत साहा यांचे गुरुवारी मुर्शिदाबाद जिल्हय़ात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. निधनासमयी ते 69 वर्षांचे होते. छातीत वेदना सुरू झाल्यावर साहा यांना बरहामपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
सागरदीघिचे तीनवेळा आमदार राहिलेलेल्या साहा यांच्यावर अलिकडेच एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. साहा यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. सुब्रत साहा यांचे सामाजिक आणि राजकीय योगदान नेहमीच लोकांच्या स्मरणात राहणार आहे. साहा यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनीही साहा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.