प. बंगालच्या राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गुरुवारी रात्री राज्यपालांना जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आला. त्यानंतर लोकभवन आणि राज्यपालांची सुरक्षा कडक करण्यात आल्याचे लोकभवन येथील एका अधिकाऱ्याने सांगितले. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर गृहमंत्री अमित शाह यांना माहिती देण्यात आल्याचे राज्यपालांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष कर्तव्य अधिकाऱ्याने सांगितले.
धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर लोकभवन येथे सीआरपीएफ आणि पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. या धमकीनंतर राज्यपालांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि विद्यमान सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी मध्यरात्री बैठक घेतली. राज्यपालांना अशा धमक्या देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना धमकीचे संदेश मिळाले आहेत.