For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाचा विस्तार

06:12 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाचा विस्तार
Advertisement

35 नव्या मंत्र्यांचा समावेश, एकंदर संख्या 41

Advertisement

► वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. सोमवारी ‘लोकभवन’ येथे एका साध्या कार्यक्रमात 35 नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ राज्यपाल आर. एन. रवी यांच्याकडून देण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 41 झाली आहे. या प्रथम विस्तारात 13 कॅबिनेट मंत्री, 19 राज्यमंत्री आणि स्वतंत्र पदभार असलेल्या 3 राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात 9 मे या दिवशी हे सरकार स्थापन झाले आहे.

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचंड विजय मिळविला आहे. त्याआधी सलग 15 वर्षे सत्तेवर असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या एकंदर 294 जागांपैकी 207 जागा मिळून दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमताची प्राप्ती झाली आहे. या राज्यात भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक जिंकण्याची ही प्रथमच वेळ आहे. बहुमत मिळाल्यानंतर काही दिवसांनी सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली.

9 मे या दिवशी शपथविधी

9 मे या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नव्या सरकारचा शपथविधी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह सहा मंत्र्यांना शपथ देण्यात आली. डॉ. दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनीया, क्षुदीराम तुडू आणि नितीश प्रामाणिक अशी त्यांची नावे आहेत. आता नव्या 35 मंत्र्यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळात करण्यात आल्याने ते जवळपास पूर्ण आकाराचे मंत्रिमंडळ बनले आहे. नियमानुसार विधानसभा सदस्य संख्येच्या 15 टक्के इतक्या प्रमाणात मंत्री नियुक्त करता येतात. त्यामुळे मंत्र्यांची संख्या 44 असू शकते. सध्या 3 पदे रिक्त आहेत.

सामाजिक समीकरणांचे भान

मंत्रिमंडळ विस्तार करताना वनवासी, दलित, अन्य मागासवर्गीय आणि सवर्ण अशा हिंदू समाजातील सर्व घटकांचा विचार करुन त्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. क्षेत्रीय समतोल सांभाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. पाच महिलांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

नव्या मंत्र्यांची श्रेणी आणि नावे पुढील प्रमाणे आहेत-

  1. कॅबिनेट मंत्री- दीपक बर्मन, तपस रॉय, डॉ. शंकर घोष, मनोज कुमार ओरांव, अर्जुन सिंग, गौरी शंकर घोष, स्वपन दासगुप्ता, जगन्नाथ चट्टोपाध्याय, कल्याण चक्रवर्ती, अजय पोद्दार, शरद्वत मुखोपाध्याय, दुधकुमार मोंडल आणि अनुप कुमार दास.
  2. राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार)- डॉ. इंद्रनील खान, मालती रेवा रॉय, राजेश महातो.
  3. राज्यमंत्री- जुआल मुर्मू, हरेकृष्ण बेरा, आनंदमय बर्मन, अशोक दिंडा, नदियार चंद्र बौरी, विशाल लामा, शांतनू प्रामाणिक, मौमिता बिस्वास मिश्रा, उमेश रे, पूर्णिमा चक्रवर्ती, कौशिक चौधरी, भास्कर भट्टाचार्य, दिबाकर घारामी, अमिया किस्कू, कालिता माझी, गार्गीदास घोष, बिरज बिस्वास, दीपांकर जाना आणि सुमन सरकार.
Advertisement
Tags :

.