Jat News | शेळ्या चारायला गेले अन् काळाने घेरलं; तरसाच्या हल्ल्यात वृद्ध पोलीस पाटलाचा मृत्यू
जत : जत तालुक्यातील अंकले येथे तरसाच्या हल्ल्यात ७५ वर्षीय बयोवृद्ध पोलीस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. कोडीराम बाबासो पाटील हे शेळ्या चारण्यासाठी डफळापूर-अंकले रस्त्यालगत असलेल्या शेतात गेले असताना त्यांच्यावर तरसाने अचानक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोडीराम पाटील हे नेहमीप्रमाणे शेळ्याचारण्यासाठी शेताकडे गेले होते. यावेळी शेत परिसरात दबा बसलेल्या तरसाने धरून त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या मानेवर, हातावर व मांडीलाही गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचेसांगण्यात येत आहे. दरम्यान, अंकले परिसरातगेल्या काही दिवसांपासून तरसाचा बाबर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता या हल्ल्यात एका वयोवृद्ध व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा
घटनेची माहिती मिळताच बनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीकेली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. हल्ला नेमक्या कोणत्या वन्यप्राण्याने केला, यासह घटनेची अधिकृत माहिती पंचनामा व तपासानंतर स्पष्ट होणार आहे.अंकले तसेच डफळापूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या प्रकारामुळे चिंता अधिकच वाढली आहे. वनविभागाने वन्यप्राण्याचा शोध घेऊन परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.