For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जंगल सफारीला गेले... अन् भरकटले

06:58 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
जंगल सफारीला गेले    अन् भरकटले
Advertisement

बेळगावचे 9 तरुण सुखरुप परतले: वनखात्याची कसरत, पालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Advertisement

प्रतिनिधी/बेळगाव

बेळगाव-गोवा मार्गावरील पारवाडनजीक घनदाट जंगलात 9 विद्यार्थी जंगल सफारीसाठी (ट्रेकिंग) गेले होते.  मात्र जंगलात वाट चुकून हे विद्यार्थी भरकटल्याने   हे सर्वजण भयभीत झाले. जंगलात अडकलेल्या या विद्यार्थ्यांसाठी वनखात्याला शोधमोहीम हाती घ्यावी लागली. तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नानंतर भरकटलेले विद्यार्थी सापडले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. हिंस्त्र प्राणी असणाऱ्या जंगलातून विद्यार्थी बाहेर पडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Advertisement

बेळगाव, वडगाव, टिळकवाडी, अनगोळ परिसरातील 9 विद्यार्थी जंगल सफारीसाठी (ट्रेकिंग) पारगड परिसरात शुक्रवारी दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी गेले होते. दरम्यान, वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात उतरण्यास मनाई केली. कर्मचाऱ्यांची नजर चुकवून विद्यार्थ्यांनी जंगलात प्रवेश केला. मात्र, थोडे अंतर पुढे जाताच विद्यार्थ्यांना रस्ता सापडेना, रस्ता चुकल्याने विद्यार्थी भयभीत झाले. साधारण दुपारी जंगलात उतरलेले विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत भरकटत राहिले. जंगलात अडकून पडल्याचे लक्षात येताच त्यांनी एकमेकांना धीर देत सुरलपर्यंत कशीबशी मजल मारली. जंगलात भरकटलेल्या तरुणांपैकी एका तरुणाच्या मोबाईलवर संपर्क झाला. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे पारवाड ग्रामस्थ, वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा शोध घेतला. अखेर मध्यरात्री 3 वाजता भरकटलेले विद्यार्थी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना सापडले. त्यानंतर शनिवारी पहाटे 4 वाजता त्यांना जंगलातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

जंगल परिसरात फिरण्यास निर्बंध

खानापूर येथील जांबोटी, पारवाड, कणकुंबी आदी ठिकाणी जंगल क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्याही टिकून आहे. वाघ, बिबट्या, तरस, अस्वल, गवे, रानडुक्कर आणि इतर प्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे जंगल परिसरात फिरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जंगल प्रवेशद्वारावर वनखात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, अतिउत्साही तरुण ट्रेकिंगसाठी जंगलात उतरू लागले आहेत. त्यामुळे अशा धोकादायक घटनांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.

जंगलात हिंस्त्र प्राणी अधिक असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, दैव बलवत्तर म्हणूनच विद्यार्थी तब्बल 18 तासांनंतरही जंगलातून सुखरुप बाहेर आले आहेत. पारवाड ग्रामस्थ आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या शोधमोहीमेमुळे सर्व विद्यार्थी जंगलातून सुखरुप परतले.

जंगलात वन्यप्राण्यांचा धोका 

अनेक तरुण-तरुणी जंगल सफारी आणि पार्टी करण्यासाठी निसर्गरम्य जंगल परिसरात फिरू लागले आहेत. मात्र, जंगलातील वाटा आणि मार्ग माहीत नसल्यामुळे अडकून पडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. शिवाय जंगलात वन्यप्राण्यांचा धोका आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर नजर ठेवावी आणि समज द्यावी, अशी मागणी होत आहे. खानापूर तालुक्यात सातत्याने बिबट्या, अस्वल, गवे, हत्तींचे दर्शन होऊ लागले आहे. शिवाय अस्वलांकडून सातत्याने हल्ल्यांचे प्रकारही घडू लागले आहेत. त्यातच उत्साही तरुण विनाकारण जंगलात फिरत असल्यामुळे जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

विनापरवाना जंगलात उतरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते

बेळगाव परिसरातील नऊ विद्यार्थी पारवाडनजीकच्या जंगलात भरकटले होते. जंगलात उतरण्याची परवानगी नसतानाही त्या तरुणांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. विनापरवाना जंगलात उतरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. जंगलात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गोवा आणि खानापूर येथील वनकर्मचाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले आहे.

- संतोष चव्हाण (एसीएफ, खानापूर)

Advertisement
Tags :

.