संभल मशिदीनजीक विहीर पूजा स्थगित
सर्वोच्च न्यायालयाकडून दिला गेला अंतरिम आदेश
वृत्तसंस्था / संभल (उत्तर प्रदेश)
संभल येथील शाही जामा मशिदीच्या नजीक असणाऱ्या विहिरीची पूजा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या मशिदीच्या नजीक उत्खनन करताना ही विहीर आढळली होती. मात्र, या विहिरीच्या पाण्याचा उपयोग करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सर्वांना अनुमती दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी होईलपर्यंत ही स्थगिती राहील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या विहिरीला ‘हरी मंदिरका कुआ’ असे संबोधण्यास आणि या विहीरीची पूजा करण्यास अनुमती देणारा आदेश संभलच्या नगरपालिकेने काढला होता. या आदेशाला मशीद व्यवस्थापन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सध्या येथे यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला असून नगरपालिकेच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. तसेच, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी स्थितीदर्शक अहवाल सादर करावा, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली.
स्थितीदर्शक अहवालाचा आदेश
सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ही विहीर हा मशिदीचाच एक भाग आहे, असा दावा मशीद व्यवस्थापनाकडून न्यायालयात करण्यात आला. तर हिंदू पक्षाच्या वतीने विष्णू शंकर जैन यांनी युक्तीवाद केला. या विहीरीचा आणि मशिदीचा कोणताही संबंध नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. न्यायालयाने या प्रकरणाच्या सत्यासत्यतेवर उहापोह न करता ही अंतरिम स्थगिती दिली. तसेच दोन आठवड्यांमध्ये स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचा आदेश नगरपालिकेला दिला.
सुनावणी लांबणीवर
या प्रकरणी पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. पुढच्या सुनावणीत स्थितीदर्शक अहवालावर विचार होण्याची शक्यता आहे. या विहिरीचा आणि मशिदीचा नेमका संबंध काय आहे, हे या स्थितीदर्शक अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, न्यायालय अंतिम निर्णय देणे शक्य आहे.