For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाण्यासाठी कंग्राळी बुद्रुक येथे विहीर खोदाई

10:24 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाण्यासाठी कंग्राळी बुद्रुक येथे विहीर खोदाई
Advertisement

जलजीवन योजनेतून 37 लाख रुपये मंजूर, विहिरीसाठी पवार कुटुंबीयांकडून जागा दान

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं.तर्फे मार्कंडेय नदीकाठावरील कै. गणपत पवार कुटुंबीयांच्या जागेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे भूमिपूजन व खोदाईचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. विहीर खोदाईसाठी जलजीवन योजनेतून 37 लाख रुपये मंजूर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच नवीन विहिरीची खोदाई होत असल्यामुळे नागरिकांना आता भरपूर दररोज पाणी मिळणार म्हणून खास महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक गावची लोकसंख्या 25 हजारहून अधिक आहे. परंतु गावामध्ये शासकीय फंडातून दोन विहिरींची खोदाई करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना 10 ते 15 दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. यामुळे आणखी एका विहिरीची गरज होती. यासाठी जलजीवन योजनेतून या विहिरीची खोदाई करण्यात येत आहे. प्रारंभी गावाजवळ समस्त पाटील बंधूंच्या जागेमध्ये विहीर खोदाईला विरोध झाल्यामुळे मार्कंडेय नदीकाठी कै. गणपत पवार यांच्या कुटुंबीयांनी कै. गणपत रामू पवार यांच्या स्मरणार्थ विहिरीसाठी जागा देऊन नागरिकांची पाण्यावाचून होणारी गैरसोय दूर केल्यामुळे ग्रा. पं. तर्फे शांता गणपत पवार, प्रशांत पवार, जोतिबा पवार, लक्ष्मी पवार, नूतन पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जोतिबा पवार व नूतन पवार यांच्या हस्ते सपत्नीक भूमिपूजन करण्यात आले. ग्रा. पं. अध्यक्षा कौसरजहॉ सय्यद, उपाध्यक्षा दीपा पम्मार, ग्रा. पं. सदस्य नवनाथ पुजारी, उमेश पाटील यांच्या हस्ते जेसीबी मशीनचे पूजन करण्यात आले. तर  ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, प्रदीप पाटील, दत्ता पाटील, अनिल पावशे, दादासाहेब भदरगडे आदींच्या हस्ते पाच श्रीफळ वाढविण्यात आले. आणि यानंतर जेसीबीच्या सहाय्याने विहीर खोदाईला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी पीडीओ गोविंद रंगागोळ, सेक्रेटरी सी. के. तळवार, ग्रा. पं. सदस्य सद्याप्पा राजकट्टी, यल्लोजी पाटील, बाबू दोडमनी, बंदेनवाज सय्यद व इतर उपस्थित होते. सूत्रसंचालन व स्वागत प्रशांत पवार यांनी केले.

Advertisement

पवार कुटुंबीयांचे यापूर्वीही सहकार्य

यापूर्वीही पवार घराण्यातील एक दानशूर व्यक्ती कै. सिद्राय पवार, तत्कालीन ग्रा. पं. अध्यक्ष असताना त्यांनी आपली शेती विकून गावासाठी पाणी व गावामध्ये प्रथम वीज आणून गाव प्रकाशमय केले. त्यांचा वारसा जपत कै. गणपत पवार यांच्या कुटुंबीयानेसुद्धा गावामध्ये भरपूर पाणी मिळावे म्हणून विहीर खोदाईसाठी आपल्या शेतामध्ये जागा देऊन सहकार्य केल्याबद्दल पवार कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.

Advertisement
Tags :

.