नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत
सर्व समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी : उशिरापर्यंत चर्चमध्ये झाल्या प्रार्थना
पणजी : लाखोंच्या संख्येने आलेल्या देशविदेशातील पर्यटकांबरोबरच गोमंतकीयांनी मोठ्या जल्लोषात मध्यरात्री 12 वाजता 2025 वर्षाचे उत्स्फूर्त स्वागत केले. पणजीसह राज्यातील सर्वच समुद्रकिनारी सायंकाळी मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी आणि 2024 च्या सूर्याला अलविदा करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पणजी, मडगाव, म्हापसा, पर्वरी, कळंगुट, वागातोर, कांदोळी, सिकेरी, मोरजी इत्यादी भागातील रस्ते वाहनांनी तुडूंब भरले होते. दक्षिण गोव्यात कोलवा समुद्रकिनारी देखील पर्यटकांची मोठी गर्दी होती.राज्यात उशिरापर्यंत अनेक ठिकाणी नृत्यरजनी चालू होत्या. अनेक डिलक्स हॉटेल्स तसेच किनारी परिसरातील हॉटेलांमध्ये नृत्यरजनींचे आयोजन केले होते. विदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात पोहोचले असून राज्यातील टुरिस्ट टॅक्सी व खासगी वाहनांना देखील सातत्याने ग्राहक मिळत राहिले.
पणजीतील कॅसिनो बोटींच्या परिसरात हजारो पर्यटक रस्त्यावर उतरले. कॅसिनो कंपन्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लेझर शो, तसेच ड्रोन शो इत्यादी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हा शो आकाशात असल्याने हजारो पर्यटकांनी त्याचा लाभ घेतला. राजधानी पणजी शहराची वाहतूक व्यवस्था कोसळली आहे. वाहतूक पोलिसांना दिवसभर ड्यूटी करून रात्री उशिरापर्यंत जागरूक रहावे लागले. शेजारील कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्रातून हजारो चार चाकी वाहनांमध्ये भरून पर्यटक आले होते. पणजी, कळंगुट, कांदोळी, म्हापसा, मोरजी, केरी, हरमल आदी भागातील सर्वच हॉटेल्स पर्यटकांनी तुडूंब भरलेली होती. अखेरीस कित्येक पर्यटकांना हॉटेल रुमही मिळाले नाहीत.
अन् रात्री 12 वाजता चर्चची घंटा वाजली
ख्रिस्ती धर्मी हे इंग्रजी वर्ष मानत असतात. त्यामुळे धार्मिक दृष्टीकोनातून ख्रिस्ती धर्मात या दिवसाला महत्त्व आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व महत्त्वाच्या चर्चेसमध्ये उशिरापर्यंत प्रार्थना झाल्या. मध्यरात्री 11 वा. 58 मिनिटांनी वीजदिवे बंद झाले आणि 12 वाजता म्हणजेच शून्य वाजून शून्य मिनिटांनी चर्चच्या घंटा वाजल्या. त्या निनादत असतानाच वीजदिवे लागले आणि चर्चच्या फादरांनी 2025 वर्ष सुरू झाल्याचे जाहीर केले. बहुतांश ख्रिस्ती पुरुषांनी सूट, कोट, टाय बांधून चर्चमध्ये प्रवेश केला तर बहुतांश महिलांनी भारतीय साडीतून चर्चमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांचे हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या. राजधानी पणजी शहरात सर्वत्रच उशिरापर्यंत नववर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. पणजी शहर हे उशिरापर्यंत जागे होते.