पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रुनेईत स्वागत
सुलतानाशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा, आज सिंगापूरचा दौरा, आर्थिक गुंतवणुकीवर वाटाघाटी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रुनेईत भव्य स्वागत करण्यात आले आहे. त्यांच्या दोन दिवसांच्या ब्रुनेई आणि सिंगापूर दौऱ्याला मंगळवारी प्रारंभ झाला. मंगळवारी दुपारी ते ब्रुनेई येथे पोहचले. या देशाचे सुलतान हसनल बोलकिया यांनी त्यांचे स्वागत केले. या देशाला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे प्रथम भारतीय नेते आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंतर ब्रुनेईच्या सुलतानांशी द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा केली. ब्रुनेईचे सुलतान हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 7 हजार अलिशान कार्सचा ताफा आहे. त्यांची संपत्ती 30 अब्ज डॉलर्सची असल्याची चर्चा आहे. भारताशी ब्रुनेईचे संबंध इतिहासकाळापासून आहेत. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता आजवर एकाही भारतीय प्रमुख नेत्याने या देशाचा दौरा केलेला नाही, अशीही माहिती देण्यात आली आहे.
सिंगापूर दौऱ्याचे महत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्याला विशेष महत्व दिले जात आहे. सिंगापूर हा भारताचा सहाव्या क्रमांकाचा व्यापारी सहकारी देश आहे. भारतात होणाऱ्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये सिंगापूरचे योगदान मोठे आहे. गेल्यावर्षी सिंगापूरने भारतात 11.77 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
सेमीकंडक्टर केंद्र बनविणार
जगात सर्वाधिक मागणी असणाऱ्या सेमीकंडक्टरचे उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणात व्हावे, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. या कामी सिंगापूर भारताला मोठे साहाय्य करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंगापूर दौरा आज बुधवारपासून आहे. या दौऱ्यात भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादन योजनेची चर्चा होणार आहे. सिंगापूर भारतात यासाठी मोठी गुंतवणूक करेल अशी शक्यता आहे.
20 वर्षांचा अनुभव
सेमीकंडक्टर उत्पादनात सिंगापूरला 20 वर्षांचा अनुभव आहे. या देशाच्या संपत्तीत या उत्पादनाने मोठी भर घातली आहे. त्यामुळे या अनुभवाचा लाभ भारतालाही होऊ शकतो. सध्या तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टरचे उत्पादन होते. चीननेही या उत्पादनाला प्राधान्य दिले आहे. भारताने प्रारंभापासून याकडे लक्ष न दिल्याने भारत हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करण्यात मागे पडला. तथापि, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ही त्रुटी भरुन काढण्याचा प्रयत्न चालविला असून भारत सेमीकंडक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे केंद्र बनला पाहिजे, अशा निर्धाराने योजना सज्ज करण्यात आली आहे. भारताचे हे स्वप्न साकार करण्यासाठी सिंगापूरकडून मोठ्या योगदानाची अपेक्षा आहे.
दुसरा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाचा प्रथम दौरा 2017 मध्ये केला होता. त्यानंतर आता 7 वर्षांनी हा त्यांचा दुसरा दौरा होत आहे. 2020 ते 2022 या कोरोना उद्रेकाच्या काळात सिंगापूरने भारताला ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासह अनेक साधनांचा पुरवठा केला होता. भारतानेही सिंगापूरला कोरोनापासून संरक्षण करणारी लस पुरविली होती. आता सेमीकंडक्टर उत्पादनात भारत आणि सिंगापूर एकमेकांना सहकार्य करण्याची योजना सज्ज करीत आहेत.
कौशल्य विकासात साहाय्य
भारताच्या सरकारने आपल्या देशातील तरुणांना विविध कौशल्यांमध्ये पारंगत करण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. या भारताच्या प्रयत्नांमध्ये सिंगापूर मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत होऊ शकतो. सिंगापूरमध्ये हा कार्यक्रम 60 च्या दशकापासूनच हाती घेण्यात आला आहे. याचा भारताला लाभ होऊ शकतो.