वकील संरक्षण कायद्याचे स्वागत
सरकारच्या निर्णयाबद्दल वकिलांनी व्यक्त केले समाधान : वकिलांवर हल्ले करणाऱ्यांना मिळणार चांगलाच धडा
बेळगाव : गेल्या काही महिन्यांमध्ये वकिलांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वकिलांनी वकील संरक्षण कायद्याची मागणी केली होती. त्यानुसार सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने वकील संरक्षण कायद्या पास केल्यामुळे त्याचे वकीलवर्गातून स्वागत होत आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून यापुढे हा कायदा लागू झाल्याने हल्ले करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळणार आहे. न्यायालयामध्ये पक्षकाराची बाजु मांडताना बऱ्याचवेळा वादावादी होत असतात. काही पक्षकार राग धरत असतात. मात्र न्यायालयामध्ये आपली बाजु वकील मांडत असतात. अशावेळी मनात राग धरुन वकिलांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे वकिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच चिक्कमंगळूर येथे वकिलाला पोलिसांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले होते.
सदर घटना ताजी असतानाच गुलबर्गा येथे एका वकिलावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे वकिलांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याचबरोबर वकिलांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले होते. गेल्या अनेक वर्षांपासून वकील संरक्षण कायदा लागू करावा, अशी मागणी केली होती. मात्र आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झालीच नव्हती. सोमवारी बार असोसिएशन तसेच तालुका बार असोसिएशनच्यावतीने कायदा मंत्री एच. के. पाटील तसेच मुख्यमंत्री सिध्दरामय्या व इतर काही मंत्र्यांची भेट घेवून वकील संरक्षण कायदा लागू करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी घेतली. तातडीने विधानसभेमध्ये याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनीच मान्यता दिली. त्यानुसार आता वकिलांना राज्यामध्ये संरक्षण कायदा लागू झाला आहे. याबद्दल वकिलांनी आभार व्यक्त केले आहेत.
कायद्याचे मन:पूर्वक स्वागत
वकिलांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या होत्या. वकिलांवर हल्ले झाल्यानंतर आम्हाला त्यासाठी आंदोलने छेडावी लागत होती. तरीदेखील हल्ले सुरूच होते. अलिकडेच एका वकिलाचा खून देखील करण्यात आला. यामुळे वकिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आता संरक्षण कायदा लागू झाल्याने त्याचे आम्ही मन:पूर्वक स्वागत करत आहे.
-प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण
प्रलंबित मागणी अखेर मान्य
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वकील संरक्षण कायदा लागू करावा, अशी मागणी केली होती. मात्र आजपर्यंत या मागणीकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आता राज्य सरकारने हा कायदा लागू केल्यामुळे प्रलंबित मागणी मान्य झाली आहे. याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
-उपाध्यक्ष अॅड. सचिन शिवण्णावर
आमच्या आंदोलनाला यश
गेल्या काही महिन्यांमध्ये वकिलांवरील हल्ले झाल्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे वकील संरक्षण कायद्यासाठी आम्ही आंदोलने केली. सोमवारी याबाबत कायदा मंत्री एच. के. पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यामुळे आम्हाला आता संरक्षण कायदा लागू झाला आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनाला यश आले आहे.
-जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील
वकिलांना मिळाला दिलासा
संरक्षण कायदा लागू केल्यामुळे वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याचवेळा यावेळी वादी, प्रतिवादीबरोबर काही वादावादी होत असतात. मात्र यामधून वकिलांवरच हल्ले होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या कायद्याची नितांत गरज होती. आता संरक्षण कायदा लागू झाल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.
-अॅड. दीपक औरवाडकर