वेटलिफ्टर लवप्रीत सिंगला रौप्य
वृत्तसंस्था
ग्लासगो
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने पुरुषांच्या 110 किलोपेक्षा अधिक वजनी गटात रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुलमधील त्याचे हे सलग दुसरे पदक ठरले. याआधी बर्मिंगहॅममध्ये लवप्रीतने कांस्य जिंकले होते. यावेळी स्नॅचमध्ये विक्रमी 176 किलो वजन उचलत तो जेतेपदाच्या शर्यतीत होता, पण शेवटच्या क्षणी अवघ्या 1 किलोच्या फरकाने त्याची सुवर्णसंधी हुकली. याशिवाय, थाळीफेक प्रकारात सीमा कालिरामणाने कांस्यपदक पटकावले. यासह भारत पदकतालिकेत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्यपदकासह एकूण 17 पदकांची कमाई करत दहाव्या स्थानी आहे.
लवप्रीतने स्नॅच राऊंडमध्ये अप्रतिम सुरुवात केली. त्याने 168 किलो, 173 किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात 176 किलो वजन उचलून नवा कॉमनवेल्थ गेम्स रेकॉर्ड प्रस्थापित केला. यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये लवप्रीतने 212 किलो वजन यशस्वीपणे उचलले, मात्र 217 किलोचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या डेव्हिड लिटीने 223 किलो वजन उचलून एकूण 389 किलोसह सुवर्ण जिंकले. लवप्रीतने एकूण 388 किलो वजन उचलून सुवर्णपदकासाठी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली, पण अखेरीस त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या ग्रिफिक्सने कांस्यपदक पटकावले.
थाळीफेकमध्ये सीमाला कांस्यपदक
महिलांच्या थाळीफेक प्रकारात भारताच्या सीमा कालिरामणाने कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत तिने दुसऱ्याच प्रयत्नात 58.65 मीटर अंतरावर थाळी फेकत तिसरे स्थान पटकावले. विशेष म्हणजे, तिच्या सहा प्रयत्नांपैकी केवळ दोनच प्रयत्न वैध ठरले, तरीही त्या कामगिरीच्या जोरावर ती पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. भारताच्या निधी राणीला 57.10 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ती अवघ्या एका स्थानाने पदकापासून दूर राहिली. दरम्यान, जमैकाच्या सामंथा हॉलने 61.66 मीटरच्या फेकीसह सुवर्णपदक, तर कॅनडाच्या ज्युलिया टंक्सने 60.67 मीटरसह रौप्यपदक पटकावले.
प्रतिक्रिया
जेव्हा सुवर्णपदक अवघ्या 1 किलोने हुकते, तेव्हा खूप दुख होते. मी 217 किलोचा जो प्रयत्न मिस केला, तो यशस्वी झाला असता तर सुवर्णपदक आपले असते.
लवप्रीत सिंग, वेटलिफ्ंिटगमधील रौप्यविजेता
माझी पहिलीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे आणि मी यात कांस्यपदक जिंकले, याचा मला खूप अभिमान आहे. इथल्या थंडीमुळे मला वारंवार ‘वॉर्म-अप‘ करावा लागला, पण मला यश मिळाले.
-सीमा कालिरामणा, थाळीफेकमधील कांस्यविजेती
भारताची पदकांसाठीची शर्यत अंतिम टप्पात
2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी, बॉक्सर अंकुश पांघल आणि प्रीती पवार यांनी आपापल्या गटांच्या अंतिम फेरीत धडक मारली असून, माजी ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा देखील आज पुरुष गटातील भालाफेकीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी आपले आव्हान सादर करणार आहे. दरम्यान, आणखी आठ भारतीय बॉक्सर उपांत्य फेरीतील लढतींसाठी सज्ज झाले असून, त्यांनी देशासाठी प्रत्येकी एक पदक आधीच निश्चित केले आहे. अॅथलेटिक्समध्ये, पुरुष गटात थाळीफेक स्पर्धेनंतर डेकॅथलीट तेजस्विन शंकर एकूण गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
आज अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण कामगिरी करणारे खेळाडू
नीरज चोप्रा (पुरुष भालाफेक), मुरली श्रीशंकर (पुरुष लांब उडी), प्रवीण चित्रवेल (पुरुष तिहेरी उडी), तेजस शिर्से (पुरुष 110 मीटर अडथळ्यांची शर्यत), पारुल चौधरी (महिला 3000 मीटर स्टीपलचेस, 5000 मीटर).
भारताल बॉक्सिंगमध्ये 12 पदके मिळणार
बॉEिक्मसगमध्ये उपांत्य फेरी व अंतिम सामन्याकरीता भारतीय संघ सज्ज झाला असून या स्पर्धेत साक्षी चौधरी (महिला 51 किलो), प्रीती पवार (महिला 54 किलो), जस्मिन लंबोरिया (महिला 57 किलो), प्रिया घांघस (महिला 60 किलो), अरुंधती चौधरी (महिला 70 किलो), लव्हलिना बोर्गोहेन (महिला 75 किलो), जादुमणी सिंग मांदेन्गबाम (पुरुष 55 किलो), सचिन सिवाच (पुरुष 60 किलो) अंकुश पांघल (पुरुष 80 किलो) नरेंद्र बेरवाल (पुरुष 90 किलो), अंकुश पांघल (पुरुष 80 किलो), प्रीती (महिला 54 किलो) यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.