वेई यी - सिंदारोव्ह पहिला सामना बरोबरीत
वृत्तसंस्था/ पणजी
चीनचा ग्रँडमास्टर वेई यीने काळ्या सोंगाट्यांसह आणखी एकदा भक्कम खेळ करून ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्हला सोमवारी येथे झालेल्या फिडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या पहिल्या सामन्यात बरोबरीत रोखले, तर तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात ग्रँडमास्टर आंद्रे एसिपेंकोने ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबबोएव्हचा पराभव केला.
फायनलच्या पहिल्या सामन्यात वेईने पुन्हा एकदा काळ्या सोंगाट्यांसह पेट्रोव्ह बचावाचा पर्याय निवडला, ज्यामुळे सिंदारोव्हला विजयाच्या शोधात जोखीम पत्करावी लागली. आणि वेईची योजना जवळजवळ यशस्वी झाली होती. कारण सामनाच्या अंतिम टप्प्यात चिनी खेळाडू थोडा मजबूत स्थितीत होता. परंतु सिंदारोव्ह त्याच्या प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या आव्हानांबद्दल सतर्क होता आणि दोन्ही खेळाडू 50 चालींनंतर सामना बरोबरीत सोडविण्यास सहमत झाले.
तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफमध्ये ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबबोएव्हने सिसिलियन बचावाचा पर्याय निवडला आणि खेळाच्या मधल्या टप्प्यात स्वत:ला अडचणीतून बाहेर काढावे लागले. त्याने एसिपेंकोशी पुढे बरोबरी करण्यात यश मिळवले. यात एसिपेंकोने निवड केलेल्या काही काही शंकास्पद हालचालींचींही त्याला मदत झाली. असे असले, तरी उझबेकिस्तानच्या ग्रँडमास्टरला निश्चितच वेळेची अडचण भासली, कारण त्याच्याकडे फक्त तीन मिनिटे शिल्लक होती आणि शेवटच्या टप्प्यात 10 पेक्षा जास्त चाली करणे शिल्लक राहिले होते.
चुकीमुळे उपांत्य फेरीतील टायब्रेकर गमावलेल्या एसिपेंकोने स्वत:चा तोल ढळू दिला नाही आणि 38 चालींनंतर याकुबबोएव्हला नमते घेण्यास भाग पाडले. आता त्याला कँडिडेट स्पर्धेतील स्थान निश्चित करण्यासाठी काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळताना बरोबरीत साधली, तरी ते पुरेसे ठरेल.