दुचाकींवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती : 1 एप्रिलपासून अंमलबजावणी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय
- येत्या 15 पासून रस्ता सुरक्षा सप्ताहात जागृती
- सरकारने अपघातांची घेतली गंभीर दखल
- प्रत्येक मतदारसंघात देणार मोफत हेल्मेट
- राज्यातील 91 ठिकाणी कॅमेरा बसविणार
- झेब्रा क्रॉसिंगसह अन्य सुविधांचीही तपासणी
- पदपथांवरील वाहनांवर होणार कारवाई
पणजी : राज्य सरकारने वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेतली असून ते टाळण्यासाठी 6 महिन्यात 61 ठिकाणी कॅमेरा बसवून ते कार्यान्वित करण्यात येणार आहेत. शिवाय येत्या 1 एप्रिलपासून दुचाकीवरील दोन्ही स्वारांना हेल्मेट सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहात हेल्मेटबाबत जागृती केली जाणार आहे. तसेच हेल्मेट मोफत देण्याची योजनाही सरकार आखणार आहे.
काल गुरुवारी झालेल्या राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीनंतर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दैनिक ‘तरुण भारत’शी बोलताना ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सध्या पणजी ते दोनापावला या रस्त्यावर कॅमेरा चालतात. तसेच कॅमेरा गोव्यातील इतर रस्त्यांवर बसवले जाणार असून अपघात घडला किंवा नियम मोडला तर वाहनचालक कॅमेराच्या माध्यमातून कुठे ना कुठे तरी सापडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्तीचे आहे. त्याची 1 एप्रिलपासून पालन करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
प्रत्येक मतदारसंघात मोफत हेल्मेट
हेल्मेट मोफत देण्याचा उपक्रम प्रत्येक मतदारसंघात करण्याचा इरादा असून प्रत्येक आमदाराने त्यासाठी पुढाकार घ्यावा, आणि खर्च करावा, असे आवाहन गुदिन्हो यांनी केले आहे. पंचायती, पालिका यांना वरील कामासाठी सहकार्य करावे असे गुदिन्हो यांनी नमूद केले.
राज्यात 91 ठिकाणी कॅमेरा बसवणार
अपघातात बळी पडणाऱ्यांचे जीव वाचवणे महत्त्वाचे असून येत्या मार्च 2026 पर्यंत 21 ठिकाणी आणि नंतर जून 2026 पर्यंत राज्यातील एकूण 91 ठिकाणी कॅमेरा बसवण्याची योजना आहे. नोव्हेंबरमध्ये विविध ठिकाणी वाहतूक पोलिस नेमले म्हणून अपघात कमी झाले आणि डिसेंबर मध्ये वाढले असेही त्यांनी सांगितले.
रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणार
रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याचा निर्णयही गोवा राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच रस्त्यांची तपासणी करण्याचे ठरवण्यात आले आहे. अपघातांचे व त्यातील बळींचे प्रमाण वाढत असून रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे हे त्याचे प्रमुख कारण असल्याची चर्चा बैठकीत झाली. रस्त्यावर, फुटपाथवर चालत फिरणाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन तसेच वाढते अपघात बळी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
फुटपाथवरही ठेवतात वाहने
रस्ते वाहनचालक तसेच पादचारी यांच्याकरीता सुरक्षित करण्यावर भर देण्यात येणार आहे. रस्त्याच्याकडेला अनेक बेकायदा बांधकामे तसेच अतिक्रमणे वाढली असून त्याचा परिणाम म्हणून वाहनांना अडथळा निर्माण होतो. पादचारी देखील अडचणीत येतात. त्यांना फुटपाथवरुन जाणे शक्य होत नाही. नाईलाजाने रस्त्यावरुन चालावे लागते. अनेक ठिकाणी फुटपाथ अतिक्रमणांनी व्यापले आहेत. यावर विचार होऊन ती हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुदिन्हो म्हणाले. नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून वेग यंत्रणा, कॅमेरा यांचा वापर करण्यात येणार आहे. बैठकीस वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी हजर होते.
झेब्रा क्रॉसिंगचीही होणार तपासणी
अपघात रोखण्याकरीता झेब्रा क्रॉसिंग तसेच इतर ठिकाणची विशेष तपासणी करण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी नमूद केले.