येत्या विधानसभा निवडणुकीत 30 जागांवर विजय मिळवू
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा दावा
त. भा. प्रतिनिधी
पणजी : भाजप हा शिस्तबद्ध आणि तळागाळातील लोकांसाठी झटणारा पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने केलेला विकास आणि राबविलेल्या योजना या जोरावर भाजप पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर येणार आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणी समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना 2027च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत प्राप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना ‘चला, उठा, सज्ज व्हा’ हा मंत्र कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही दिला असल्याने भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत 30 जागा जिंकेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, सर्वानंद भगत उपस्थित होते.
दामू नाईक यांनी सांगितले की, 209 सदस्यांपैकी 197 सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या विजयासाठी कार्यकर्ते व नेते पूर्णपणे तयार आहेत. युतीच्या प्रश्नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, युतीबाबतचा निर्णय हा पक्षाचे केंद्रीय नेतृत्वावर अवलंबून आहे. त्यामुळे सध्यातरी पक्षाने सर्व 40 मतदारसंघात तयारी करण्याचे ठरविले आहे. असे असले तरी युतीबाबतचा निर्णय योग्यवेळी नक्कीच घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 40 मतदारसंघापैकी अनेक मतदारसंघात भाजपची संघटना भरीव कार्य करीत आहे. परंतु तरीही त्यापैकी काही मतदारसंघात बळकटी आणण्यासाठी भाजपचे जोरदार कार्य सुरू आहे. प्रत्येक बुथचा कार्यकर्ता प्रत्येक मतदारसंघाची भरीव कार्य करीत असल्याने किमान 30 मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावाही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला.