केएससीएचा कायापालट करणार : वेंकटेश प्रसाद
ऑटोनगर बेळगाव येथील केएससीए मैदानाला धावती भेट, विकासाला देणार गती
बेळगाव : बेळगाव स्टेडियमला प्रथम केंद्रस्थानी मानून राज्यातील क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठे बदल करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी, बळकटीकरण आणि विस्तारावर पूर्ण लक्ष केंद्रित केले जाईल. या ठिकाणी राजकारणाला थारा देणार नाही, क्रिकेट समृद्धीसाठी आपले प्रयत्न कायम राहतील. केवळ आणि केवळ क्रिकेट समृद्ध करुन त्याचा कायापालट करणार आहे, असे मत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) चे नवे अध्यक्ष आणि माजी भारतीय मध्यमगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केले. बुधवार सकाळी बेळगावातील कणबर्गी येथील केएससीए स्टेडियममध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटकातील क्रिकेटमध्ये अखेर एक बहुप्रतिक्षित सकारात्मक बदल करायवयाचा आहे.
मी प्रथमच बेळगावतील स्टेडियमला आलो आहे. येथे पायाभूत सुविधांच्या स्थितीबद्दल आनंदी आणि चिंतित आहे. मैदान चांगले आहे,परंतु स्टेडियम व भोवती असणाऱ्या स्टॅन्ड या वितरीक बऱ्याच सुधारणा आवश्यक आहे. मागील तीन वर्षांपासून या ठिकाणी कोणत्याच स्पर्धा भरविल्या नाहीत. यापूर्वी अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांनी विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला. पण अद्यापही बरीच कामे अपूर्ण आहेत, त्याची तातडीने पूर्णता करण्यासाठी आम्ही पाऊल उचलणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. बेळगावमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर वेंकटेश प्रसाद यांनी या चर्चेचे वर्णन सकारात्मक आणि उत्साहवर्धक असे केले. ते म्हणाले, 2025 च्या आयपीएल हंगामात आरसीबीने चषकावर आपले नाव कोरले. मात्र त्याचबरोबर घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेखही यावेळी केला.
या घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. बीसीसीआय सतत संपर्कात असून संबंधित प्रकरणावर तातडीने निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या सदर दुर्घटनेमुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर महिला विश्वचषकातील सामने आणि इतर अनेक महत्त्वाचे सामने होऊ शकले नाहीत. त्यामुळे नुकसान झाले आहे. याची भरपाई करण्यासाठी, बीसीसीआयने आम्हाला द्विपक्षीय मालिका सामने आणि आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांचेही आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे, असे देखील वेंकटेश प्रसाद यांनी सांगितले. रविवारी पदभार स्वीकारणाऱ्या वेंकटेश प्रसाद यांनी लागलीच सोमवारपासून कामालागती दिली आहे. कर्नाटक राज्यातील विविध क्रीडाक्षेत्रातील अधिकारी, मंत्री, समित्या, मैदाने यांची पाहणी करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.
बुधवारी त्यांनी बेळगावला भेट दिली. यावेळी वेंकटेश प्रसाद यांनी क्रिकेटच्या पुनर्बांधणी बरोबरच समस्या सोडविण्यासाठी आपण सक्षम असल्याचे सांगितले. दरम्यान बेळगाव, शिमोगा, तुमकूर, हुबळी आणि इतर केंद्रांचा विकास लवकर करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरविण्यासाठी तातडीने चालना देण्यासाठी नियमितपणे प्रोत्साहन आणि प्रयत्न राहतील. सध्या आवासून उभे असलेल्या समस्या सोडविण्या बरोबरच खेळाडूंना भेडसावणाऱ्या मैदानांची डागडुजी करण्यावर भर राहील. त्यामुळे आता केवळ राज्यातील क्रिकेट क्रीडापटूंना प्रोत्साहनच नाही तर त्यांच्या क्रीडावृत्तीच्या विकासाला चालना देण्याचा मानस असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी केएससीए धारवाड विभागाचे संयोजक व माजी समन्वयक अविनाश पोतदार, केएससीएचे उपाध्यक्ष सुजित सोमसुंदर,सचिव संतोष मेनन आणि विनय मृत्युंजय हे उपस्थित होते.