For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इतिहासाचा बदला घेणारच!

06:18 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
इतिहासाचा बदला घेणारच
Advertisement

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा शत्रूराष्ट्रांना इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विकसित भारत ‘यंग लीडर्स डायलॉग’च्या उद्घाटन समारंभात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी देशाच्या शत्रूंवर तीव्र हल्ला चढवला.  राष्ट्राची इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी युद्धे लढली जातात. शत्रूचे मृतदेह किंवा तुटलेले अवयव पाहून समाधान मिळण्यासारखे आम्ही मनोरुग्ण नाही, असे खडे बोल सुनावले. तसेच हा स्वतंत्र भारत नेहमीच आता दिसतो तितका स्वतंत्र नव्हता. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी बलिदान दिले. त्यांनी प्रचंड अपमान सहन केला आणि प्रचंड असहाय्यतेचा काळ अनुभवला. या काळात अनेक लोकांना फाशी देण्यात आली. आपली गावे जाळण्यात आली. आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले. आपली मंदिरे लुटण्यात आली आणि आपण मूक प्रेक्षक राहून असहाय्यपणे पाहत राहिलो, असा जुना इतिहास सांगत त्याचा बदला घेण्याची वेळ आल्याचा इशाराही डोवाल यांनी दिला. शनिवारी नवी दिल्लीत ‘यंग लीडर्स डायलॉग’च्या उद्घाटन समारंभात अजित डोवाल यांनी ही टिप्पणी केली.

Advertisement

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी युवकांना मार्गदर्शन करताना इतिहासातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात असे सांगितले. आज भारतातील प्रत्येक तरुणाच्या मनात बदलाची आग असली पाहिजे. बदला हा शब्द आदर्श नाही, तर त्याला आपण स्वत:मधील शक्ती बनवली पाहिजे. आपण आपल्या इतिहासाचा बदला घेतला पाहिजे. आपण या भारताला अशा टप्प्यावर परत घेऊन जायला हवे जिथे आपण आपल्या हक्कांवर, विचारांवर आणि श्रद्धांवर आधारित एक महान भारत निर्माण करू शकतो, असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान सोमवारी संवाद साधणार

पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, 12 जानेवारी रोजी ‘यंग लीडर्स डायलॉग’मध्ये भारत आणि परदेशातील 3,000 हून अधिक तरुणांशी संवाद साधतील. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान भारत मंडपम येथे आयोजित या समारोप सत्रात सहभागी होतील. संवादातील निवडक सहभागी पंतप्रधानांसमोर 10 वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे अंतिम सादरीकरण करतील. त्यांचे मार्गदर्शन देशातील युवा वर्गासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Advertisement

.