For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हम होंगे कामयाब...

06:24 AM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
हम होंगे कामयाब
Advertisement

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारून अंतिम फेरीत धडक मारल्याने टीम इंडिया आता इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचली आहे. या सामन्यात भारतीय महिलांनी घडवलेल्या वीजिगीषू वृत्तीचे दर्शन बघता दक्षिण आफ्रिकेवर मात करून भारतीय महिला मुंबईत निश्चितपणे तिरंगा फडकवतील, असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झालेला दिसतो. हार आणि जीत हा प्रत्येक खेळाचा भाग असतो. आत्तापर्यंत दोन वेळा भारतीय संघाला विश्वचषकाने हुलकावणी दिली आहे. परंतु, भारतीय महिला संघाने या स्पर्धेत केलेले कमबॅक आणि मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याचे दाखवलेले धैर्य याचा विचार करता निश्चित आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची महिला क्रिकेटपटूंना संधी असेल. यंदाचा विश्वचषक भारतात म्हणजे घरच्या मैदानावर होणे, हा आपल्यासाठी सर्वांत मोठा प्लस पॉईंट ठरतो. घरचे मैदान, तेथील खेळपट्टीची नस खेळाडूंना माहीत असते. त्यामुळे खेळ उंचावण्याकरिता त्याची मदत मिळते. स्वाभाविकच घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघाची सुऊवात अपेक्षेप्रेमाणे अतिशय आत्मविश्वासाने झाली. पहिल्याच सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केले. त्यानंतर पाकिस्तानविऊद्ध सामना झाला. या सामन्यातही भारताने पाकिस्तानला दणका दिला. येथपर्यंतचा भारतीय संघाचा प्रवास हा स्वप्नवत होता. परंतु, त्यानंतरच्या टप्प्यात तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर भारताचा खऱ्या अर्थाने कस लागला. साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांसारख्या मजबूत संघांसमोर भारताची डाळ शिजली नाही. त्यांच्यासोबतचे तिन्ही सामने आपल्याला गमवावे लागले. किंबहुना, यातील प्रत्येक सामन्यात महिला संघाने प्रतिस्पर्ध्याशी कडवी झुंज दिली, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रामुख्याने फलंदाजांनी उल्लेखनीय खेळ केला. परंतु, गोलंदाजांची कामगिरी अपेक्षित झाली नाही आणि त्याचाच फटका संघाला बसला, असे दिसून आले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडविऊद्धचा सामना ‘करो वा मरो’ अशाच पद्धतीचा होता. यामध्ये भारतीय संघाने विजय साकारून सेमीफायनलमध्ये धडक मारली. या सामन्यामध्ये स्मृती मानधना, प्रतिका रावल यांनी मारलेली शतके वैशिष्ट्यापूर्ण ठरली. दोघींनी सलामीला येऊन द्विशतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. मात्र, प्रतिका जायबंदी झाल्याने उपांत्य सामन्यात आपल्यापुढील अडचणी वाढल्या होत्या. तिच्या जागी अखेर शेफाली वर्मा हिची निवड करण्यात आली. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवून आधीच अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दक्षिण आफ्रिकेविऊद्ध अंतिम सामना कोण खेळणार याबाबत उत्सुकता होती. सेमीफायनलमध्ये परत एकदा सातवेळा विश्वविजेते ठरलेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्ध खेळायचे होते. या सामन्यातही ऑस्टेलियाची विश्वचषकातील कामगिरी पाहता त्यांचेच पारडे जड मानले जात होते. उपांत्य सामन्यात ऑस्टेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने सुऊवातही आपल्या नेहमीच्या धडाक्यात केली. भारतीय गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत ऑस्ट्रेलियाने 338 धावांचा डोंगर रचला. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूने विजयाचे पारडे झुकल्याचे दिसत होते. स्मृती आणि शेफाली झटपट तंबूत परतल्याने कांगारूंच्या विजयाची औपचारिकताच निर्माण झाल्याचे वातावरण होते. तथापि, जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांनी सूत्रे हातात घेतली आणि बघताबघता वातावरण पालटले. या दोघींनी एकेरी, दुहेरी धावा घेतानाच संधी मिळेल, तेव्हा सीमारेषेपार चेंडू तडकावले. त्यामुळे संघाचा धावफलक हलता ठेवण्यास मदत झाली. चौकार, षटकाबरोबरच एकेरी, दुहेरी आणि चोरट्या धावांचेही क्रिकेटमध्ये महत्त्व असते. त्यातूनदेखील प्रतिस्पर्धी संघावरचा दबाव वाढवता येतो. या दुकलीने तेच केले. त्यातून भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला गेला. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहिलेल्या जेमिमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. तिने नुसते शतक ठोकले नाही, तर विजयाचा दरवाजा संघाकरिता सताड उघडा करून दिला. शतकानंतरही सेलिब्रेशनऐवजी शांत डोक्याने खेळ करण्यावर तिने भर दिला. अगदी कर्णधार हरमनप्रीत आऊट झाल्यावरही तिचा तोल ढळला नाही. मोठ्या क्रिकेटपटूची हीच खूण असते. कठीण परिस्थितीतही त्यांचा संयम कायम असतो.  दीप्ती शर्मा, रिचा घोष यांना सोबत घेत सामना आपल्या हातून निसटणार नाही, याची तिने पुरेपूर काळजी घेतली. वास्तविक आधी अतिरिक्त गोलंदाज खेळवायचा म्हणून तिला खेळवण्यात आले नव्हते. परंतु मोक्याच्या क्षणी तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली. स्वाभाविकच आता अंतिम सामन्यातही हरमनप्रीतच्या संघाकडून भारतीय चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा असतील. स्मृतीदेखील सध्या चांगल्या लयीत आहेत. शेफालीचा आयत्या वेळी संघात समावेश झाला असला, तरी अंतिम सामन्यात तिला खेळ दाखविण्याची संधी असेल. हरमन, जेमिमा, दीप्ती, रिचा यांच्यावर पुन्हा एकदा आशा असतील. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मूल्यमापन करायचे झाल्यास हा संघ फलंदाजीच्या आघाडीवर निश्चितच वाघ असल्याचे दिसून येते. 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावा भारतीय महिला सहज करू शकतील. तथापि, आपल्या गोलंदाजीमध्ये मोठ्या उणिवा दिसतात. त्यामुळे अंतिम सामन्यामध्ये गोलंदाजीवर आपल्याला विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. क्षेत्ररक्षणातही सुधारणा कराव्या लागतील. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही पातळ्यांवर अप्रतिम कामगिरी केली, तर विश्वचषक आपल्यापासून दूर नाही. एकूणच महिला शक्ती नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज आहे. ‘हम होंगे कामयाब’ असा निर्धार त्यांच्या ठायी असून, हे स्वप्न प्रत्यक्षात यावे, अशीच सर्व भारतीयांची इच्छा असेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.