‘आम्ही न थांबता इराणवर अधिक प्रभावी हल्ला करू’
वृत्तसंस्था/ जेरुसलेम
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या लोकांना त्यांच्या देशातील सध्याच्या राजवटीविरुद्ध उभे राहण्याचे थेट आवाहन केले आहे. अमेरिका-इस्रायली लष्करी हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर, नेतन्याहू यांनी ‘सध्याच्या राजवटीला उलथवून टाकण्यासाठी’ मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. तसेच येत्या काही दिवसांत आम्ही या दहशतवादी राजवटीच्या हजारो लक्ष्यांवर हल्ला करू. आम्ही इराणच्या धाडसी लोकांना हुकूमशाहीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी परिस्थिती निर्माण करू. नजिकच्या काळात आम्ही न थांबता यापेक्षाही प्रभावीपणे हल्ले करू शकतो, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. तसेच आता इस्रायलने ‘हल्ला भाग-2’ला मंजुरी देत इराणविरोधातील लढा तीव्र करण्याची तयारी दर्शवली आहे.
अलीकडील हल्ल्यांनंतर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ संदेशात नेतन्याहू यांनी इस्रायलची भूमिका स्पष्ट केली. सांगितले की इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे इराणची सत्ताधारी व्यवस्था कमकुवत होईल आणि लोकांना त्यांनी वर्णन केलेल्या ‘दहशतवादी राजवटी’ला आव्हान देण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले. या इशाऱ्यानंतर आता अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमुळे आणि इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवायांमुळे पश्चिम आशियामध्ये तणाव वाढल्यामुळे दीर्घकाळ आणि व्यापक संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे.