इराणला आम्ही अश्मयुगात पोहचवू
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा : येत्या दोन-तीन आठवड्यांमध्ये इराणवर भीषण आघात करणार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
पुढच्या दोन-तीन आठवड्यांपर्यंत अमेरिका इराणवर जोरदार आणि उग्र वायूआक्रमणे करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकेला उद्देशून केलेल्या अठरा मिनिटांच्या भाषणात हा इशारा दिला. इराणला इतके धक्के देले जाणार आहेत, की तो देश पूर्वी जसा अश्मयुगात होता, तसा तो आताही पोहचणार आहे. अमेरिकेने या युद्धाचा प्रारंभ ज्या उद्दिष्ट्यांसाठी केला. ती अपेक्षेइतकी किंवा अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साध्य झाली आहेत, असे प्रतिपादन करत हे युद्ध येत्या दोन किंवा तीन आठवड्यांध्ये थांबू शकते, असा महत्त्वाचा संकेतही त्यांनी त्यांच्या भाषणात दिला. त्यांच्या या भाषणावर जगभरातून परस्पर विरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. इराणने अमेरिकेशी सहा महिने युद्ध करण्याची क्षमता असल्याची घोषणा एक दिवस आधी केली आहे.
या संपूर्ण भाषणात अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणशी शांतता चर्चा करण्याच्या संबंधात कोणतेही भाष्य केलेले नाही, हे महत्त्वाचे मानले जात आहे. 6 एप्रिलपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त करा, असा अंतिम समय ट्रम्प यांनी दिला होता. हा कालावधी आता संपत आला आहे. तथापि, अद्यापही या सामुद्रधुनीच्या परिस्थितीत फारसे अंतर पडलेले नाही. हा कालावधी संपल्यावर अमेरिका इराणवर हल्ले करणार की आधी करणार, याविषयी आता जागतिक वर्तुळात चर्चा होत आहे.
नाही निश्चित कार्यक्रम
या युद्धामुळे जगात ऊर्जा आणि इंधन संकट निर्माण झाले आहे. हे संकट संपविण्यासाठी अमेरिका काय आणि कशाप्रकारे काम करणार आहे, याची कोणतीही रुपरेषा ट्रम्प यांनी स्पष्ट केली नाही. तसेच ही सामुद्रधुनी मुक्त करून तेल आणि इंधन वायूच्या नौकांना मार्ग उपलब्ध कसा करून दिला जाणार आहे, याची कोणतीही समयसूची त्यांनी घोषित केली नाही. तथापि, अमेरिका इराणवर भूमीवरून आक्रमण करणार नाही, याचे संकेत त्यांच्या भाषणातून मिळत आहेत.
इराणचे 70 लाख सैनिक युद्धासाठी सज्ज
इराणच्या संसदेचे सभाध्यक्ष मोहम्मद बाघर क्वालीबाफ यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिकेने भूमीवर युद्ध केले तर देशाचे संरक्षण करण्यासाठी आमचे 70 लाख सैनिक सज्ज आहेत, असा दावा त्यांनी केला. गेल्या आठवडाभरात इराणच्या प्रशासनाने देशभर अभियान चालविले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये देशासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे, अशी मांडणी त्यांनी केलेलाr आहे.
होर्मुझमधील वाहतूक 94 टक्के कमी
गेल्या वर्षीच्या तुलनेत या गेल्या महिन्यात होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक 94 टक्के कमी झाली आहे. तेल आणि इंधन वायूच्या वाहतुकीला सर्वात मोठा फटका बसला आहे. युद्ध थांबले, तरी स्थिती पूर्ववत होण्यासाठी काही महिने लागणार आहेत. तोपर्यंत जगाला इंधनाची समस्या भेडसावणार, असे दिसत आहे.
इराणी नागरिकांना भीती किरणोत्साराची
अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवर किंवा अणुवीज प्रकल्पांवर हल्ले केले, तर घातक किरणोत्सर्जन होण्याची शक्यता आहे. याची सर्वाधिक भीती इराणी नागरिकांना वाटत आहे. आमचे भवितव्य अंधारात चाचपडत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक इराणी नागरिक व्यक्त करीत आहेत. इराणमध्ये इंटरनेटवर बंदी असल्याने ते मुक्तपणे त्यांचे विचार व्यक्त करू शकत नसले, तरी त्यांनी जमेल त्या मार्गाने त्यांच्या भावना जगापर्यंत पोहचविण्यास प्रारंभ केला आहे. इराणी नागरीकांना हे युद्ध नको असल्याचे संकेत मिळत आहेत. या युद्धात आतापर्यंत सर्वाधिक जीवीत आणि वित्त हानी इराणचीच झाली आहे. तसेच तेथील जनतेला आता मोठ्या प्रमाणात अन्नपाणी आाणि औषधे यांचा तुटवडा जाणवत आहे.
ट्रंप यांच्या इशाऱ्याने गोंधळात भर
ड युद्ध नेमके कधी थांबणार, याविषयी निश्चित वेळापत्रकाची नाही घोषणा
ड इराणशी अमेरिका भूमीवरील युद्ध करणार नाही याचे मिळाले स्पष्ट संकेत