सहकार क्षेत्रातील अडचणी दूर करू
नवी दिशा देण्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही : सिंहगड रोड शाखेचे स्थलांतर
पुणे : सहकाराच्या वाढीसाठी या क्षेत्रातील अडचणी दूर करण्यास आपले प्राधान्य राहणार आहे. सहकाराला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी येथे दिली. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’च्या सिंहगड रोड शाखेच्या स्थलांतरण सोहळ्याचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, संचालक गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, आमदार भीमराव तापकीर, ‘सोसायटी’चे झोनल मॅनेजर सुशील जाधव आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ग्रामीण विकास, अर्थकारणाबरोबरच सर्वसामान्यांना आधार देण्यात सहकाराची भूमिका महत्त्वाची आहे. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराच्या स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली. सोसायट्यांच्या सक्षमीकरणावर तसेच बँकांना समृद्ध करण्यावर भर दिला जात असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. पुढच्या टप्प्यात सहकाराला वेगळी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. शाखा विस्तार वा तत्सम मर्यादांविषयीच्या किरणमामांनी ज्या अडचणी मांडल्या, त्या सोडविण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सहकार वाढविण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही निश्ंिचत रहा. ही चळवळ सर्वदूर पोहोचविण्याला प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘लोकमान्य’ची इतर क्षेत्रातही आघाडी
डॉ. किरण ठाकुर म्हणाले, ‘लोकमान्य’ने बँकिंगबरोबरच इतर क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. मधल्या काळात कर्नाटकमध्ये आम्ही भरडलो गेलो. आम्हाला गाडण्याचे प्रयत्न झाले. आज ‘लोकमान्य’कडे 9 हजार कोटींच्या ठेवी आहेत. यातील 3 हजार कोटीच्या ठेवी एकट्या पुण्यातील आहेत. संस्थेच्या 213 शाखा आहेत. मात्र, आजमितीला शाखाविस्ताराबाबत मर्यादा येत आहेत. या अडचणी दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा डॉ. ठाकुर यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवानिमित्त ‘लोकमान्य’ची मोदक निवेश योजना
गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य मोदक निवेश योजनेचे अनावरणही या वेळी करण्यात आले. या योजनेमध्ये सभासदांना 10.50 टक्के परतावा मिळणार आहे. योजनेत किमान गुंतवणूक दहा हजार ऊपये आहे. या वेळी संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ, माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे, श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, हरिदास चरवड तसेच निशा कोरगावकर, बुलढाणा अर्बनचे सीईओ शिरीष देशपांडे, विश्वेश्वर बँकेचे चेअरमन अनिल गाढवे व अन्य मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सुशील जाधव यांनी आभार मानले.