सफाई कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने सेवेत कायम करू
राज्य सफाई कर्मचारी विकास महामंडळाचे अध्यक्ष मुरळी अशोक सालप्पा यांचे आश्वासन
बेळगाव : सरकारने आपल्या जाहिरनाम्यात सफाई कर्मचाऱ्यांना दिलेल्या वचनानुसार 20 हजार कर्मचाऱ्यांना आधीच सेवेत कायम केले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाईल, असे कर्नाटक राज्य नागरी सफाई कर्मचारी विकास महामंडळाचे अध्यक्ष मुरळी अशोक सालप्पा यांनी सांगितले.
कर्नाटक राज्य सफाई कर्मचारी विकास महामंडळ आणि बेळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे थेट वेतन घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिर, जनजागृती कार्यक्रम तसेच आरोग्य विमा कार्ड वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलताना म्हणाले की, सरकार सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी पाच लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस आरोग्य विमा सुविधा देत आहे ते या कार्डाचा वापर करून सेवानिवृत्तीपर्यंत आरोग्य उपचार घेऊ शकतात. सालप्पा अहवालानुसार 56 पैकी 34 मागण्या आधीच पूर्ण करण्यात आल्या आहेत. सरकार सफाई कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर प्रीती कामकर म्हणाल्या, शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सरकारच्या विमा योजनेसोबतच महापालिका सर्व सुविधाही पुरवेल. उपमहापौर हणमंत कोंगाली म्हणाले, विकास कामांसाठी महानगरपालिकेला सरकारकडून नियमित अनुदान मिळाले पाहिजे. त्यासाठी सरकारकडे आग्रह धरला जाईल. सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदार निकृष्ट दर्जाचा अल्पोपाहार देत असल्याचा आरोप आहे. त्याऐवजी अल्पोपाहारासाठी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणे योग्य ठरेल.
मनपा आयुक्त कार्तिक एम. म्हणाले, या विमा योजनेचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना होईल. महापालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल. गो डिजीट इन्शुरन्स कंपनीचे समन्वय टी. एल. कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, देशात प्रथम कर्नाटक राज्यात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी 5 लाखांची विमा योजना लागू करण्यात आली आहे.
या कार्डद्वारे कामगारांना कोणत्याही रुग्णालयात 30 हजारहून अधिक आजारांवर उपचार मिळू शकतात. यावेळी निगमचे व्यवस्थापकीय संचालक टी. कुमार यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक बाबाजान मतवाले, निगमचे पदाधिकारी राजीव साखे यांच्यासह इतर उपस्थित होते. मनपाच्या 155 सफाई कार्मचाऱ्यांना पाहुण्याच्या हस्ते विमा कार्डचे वितरण करण्यात आले. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी शिबिरात कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.