1 ग्रॅम समृद्ध युरेनियम देशाबाहेर पाठवणार नाही!
इराणने अमेरिकेला सुनावले : विश्वास निर्माण होईपर्यंत चर्चेस नकार : नाकाबंदी उठवण्याची मागणी
वृत्तसंस्था, तेहरान
अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकार्यक्रमावरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. इराणने पुन्हा भूमिका स्पष्ट करत समृद्ध युरेनियमचा एक ग्रॅमही दुसऱ्या देशात पाठवणार नसल्याचे जाहीर केले. अमेरिकेने विश्वास निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलली आणि इराणच्या सर्व अटी मान्य केल्या, तरच चर्चेचा विचार केला जाईल, असे इराणच्या नेतृत्वाने म्हटले आहे.
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसिन रजाई यांनी अमेरिकेवर अविश्वास व्यक्त केला. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनीही अमेरिकेने इराणच्या 7 अटी पूर्ण केल्याशिवाय विश्वास संपादन करता येणार नसल्याचे सांगितले. इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनेई यांनीही शस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक पातळीच्या जवळ पोहोचलेल्या समृद्ध युरेनियमचा साठा देशाबाहेर पाठवू नये अशी भूमिका मांडली आहे.
अणुकार्यक्रमावरून मतभेद
इराणचा अणुकार्यक्रम हा दोन्ही देशांमधील संभाव्य करारातील प्रमुख अडथळा आहे. अमेरिकेचे अपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी या महिन्याच्या सुरुवातीला इराणने युरेनियम संवर्धनाची क्षमता लक्षणीयरित्या कमी करावी, अशी मागणी केली होती. अमेरिकेच्या मते, संघर्ष संपवण्यासाठी आणि कराराच्या दिशेने पुढे जाण्यासाठी हे आवश्यक आहे. समृद्ध युरेनियम म्हणजे युरेनियममधील विशिष्ट समस्थानिकाचे प्रमाण वाढवलेले स्वरुप. त्याचा वापर अणुऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो. मात्र अधिक संवर्धन झाल्यास त्याचा वापर अण्वस्त्रनिर्मितीसाठीही शक्य होतो.
60 टक्के संवर्धनावरून चिंता
अमेरिका, इस्रायल आणि काही पाश्चात्य देश इराण अण्वस्त्रs विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करतात. इराणने युरेनियम संवर्दान 60 टक्क्यांपर्यंत केल्यामुळे या देशांची चिंता वाढली आहे. नागरी अणुऊर्जा निर्मितीसाठी सामान्यत: इतक्या उच्च पातळीच्या संवर्धनाची आवश्यकता नसते. अण्वस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या युरेनियमचे संवर्धन साधारणत: 90 टक्क्यांच्या आसपास असते.
इराणने अमेरिकेसमोर मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
?इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नाकाबंदी उठवणे
?इराणच्या तेल निर्यातीवरील निर्बंध हटवणे
?संघर्षग्रस्त प्रदेशातील सर्व आघाड्यांवर लढाई थांबवणे
?चर्चेसाठी विश्वासार्ह वातावरण निर्माण करणे