कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठी भाषिकांच्या समस्या मांडू
मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : सीमाभागातील लोक मराठी बोलतात. त्यामुळे त्यांना मराठीत बोलण्यास दिले गेले पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन मी मराठी भाषिकांच्या समस्या व अडीअडचणी सांगणार आहे, असे महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बेळगावातील एका हॉटेलमध्ये रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री उदय सामंत बोलताना म्हणाले, बेळगावातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी आलो आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले होते. शनिवारी रात्री 2 वाजता त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. यासाठी सरकार सकारात्मक असून मनोज जरांगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. मराठा समाजाला त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. महायुती सरकार मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. सरकारच्या निर्णयांची माहिती मी स्वत: सरपंचांच्या मार्फत जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. त्यांनी उपोषणाला बसू नये, असे मत सरकारसह एकनाथ शिंदे यांचे होते. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी त्यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. जरांगे यांनी आंदोलन मागे घेतल्याने सर्वप्रथम त्याचे स्वागत करतो, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा खटला सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा.
सध्या विधान परिषदांच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रात आचारसंहिता लागू आहे. उच्चाधिकार समितीची बैठक व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी मध्यस्थी करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला वेळ द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून भेट घडवून आणण्यात येईल. यापुढे कोणतीही समस्या किंवा चर्चा करायची असल्यास समिती नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अडीअडचणी मी त्यांना सांगणार आहे. सीमाभागातील लोक मराठी बोलतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत बोलण्यास दिले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रासाठी बेळगाव हे बेळगावच!
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री बेळगाव दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या प्रवास दौऱ्याची माहिती (टीपी) आधीच कळविण्यात आली होती. मात्र, टीपीमध्ये बेळगाव ऐवजी बेळगावी असा उल्लेख करण्यात आल्याने सीमावासियातून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत पत्रकारांनी मंत्री सामंत यांना विचारणा केली असता त्यांनी घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. ज्या कोणाकडून ही चूक झाली आहे, त्याचा समाचार घेतला जाईल. महाराष्ट्रासाठी बेळगाव हे बेळगावच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवा लोहार याच्यावर उपचार
फटाके फोडताना डोळ्यांना गंभीर इजा झालेला समिती कार्यकर्ता शिवा लोहार याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा दृष्टी मिळवून देण्याचे कार्य महाराष्ट्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकार, शिवसेना नेता व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे साहाय्यक मंगेश चिवटे व इतरांचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर म. ए. युवा समिती आणि म. ए. युवा सीमाभाग समितीच्यावतीने देखील मंत्री सामंत यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, मोतेश बारदेसकर, सागर पाटील यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
सीमाभागातील 22 ग्रंथालयांना महाराष्ट्राकडून 1 कोटी
मी स्वत: महाराष्ट्राचा मराठी भाषा मंत्री आहे. बेळगावातील मराठी संस्था व ग्रंथालये आपली आहेत. त्यामुळे ती टिकली पाहिजेत, यासाठी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकारकडून संबंधित संस्था आणि ग्रंथालयांना अर्थसाहाय्य केले जात आहे. त्यानुसार गेल्या चार दिवसांपूर्वी सीमाभागातील 22 ग्रंथालयांना महाराष्ट्र सरकारकडून 1 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.