कन्नडसक्ती विरोधातील मोर्चा यशस्वी करणार
तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय : गावोगावी पत्रकांचे होणार वाटप
बेळगाव : बेळगावसह संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या 15 टक्क्यांहून अधिक असतानाही मराठी फलक हटविण्यात आले. तसेच व्यापारी व आस्थापनांवर 60 टक्के कन्नड व उर्वरित जागेमध्ये इतर भाषा या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व सरकारी कार्यालये तसेच बस व इतर ठिकाणी या नियमाची प्रथमत: अंमलबजावणी करावी, त्यानंतरच व्यापाऱ्यांवर सक्ती करावी, या मागणीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
रविवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा नेते आर. एम. चौगुले होते. कन्नड संघटनांच्या दबावाखाली प्रशासनाकडून कन्नड भाषेची सक्ती केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी इंग्रजी व मराठी फलकांना महानगरपालिकेकडून रंग फासण्यात आला. तर महानगरपालिकेतील मराठी फलक झाकण्यात आले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक केंद्रे यांच्यावरही कन्नड भाषेचा वापर करण्यासाठी दबाव आणला जात आहे. प्रशासनाच्या या कन्नडसक्ती विरोधात सोमवार दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन दिले जाणार आहे.
या मोर्चावेळी बेळगाव तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यापूर्वी म. ए. समितीचे आमदार, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्राम पंचायतींमध्ये प्रतिनिधी असल्याने दबदबा होता. तसेच कोणतेही काम तातडीने करून घेता येत होते. सध्या मात्र म. ए. समितीचे लोकप्रतिनिधी नसल्याने अनेकजण आमदार-खासदारांच्या मागे जात आहेत. त्यामुळे तालुक्यातील नेतेमंडळी तसेच कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून गावोगावी संपर्क वाढविणे गरजेचे आहे. आतापासूनच संपर्क वाढला तर पुढे निवडणुकांना सामोरे जाणे सोयीचे होईल, असे मत महादेव कंग्राळकर यांनी व्यक्त केले. बैठकीवेळी नारायण सावगावकर, मनोहर हुंदरे, विनायक पाटील, आर. के. पाटील, पियुष हावळ, अनिल पाटील, मनोहर संताजी यांनी भावना व्यक्त केल्या. अॅड. एम. जी. पाटील यांनी मोर्चाविषयी माहिती देऊन शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी मोनाप्पा पाटील, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, विठ्ठल पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभागवार जागृती
तालुका म. ए. समितीने विभागवार जागृतीसाठी कमिट्या तयार केल्या आहेत. उचगाव विभाग, बेळगुंदी विभाग, किणये विभाग, सांबरा-हलगा विभाग, कडोली-काकती विभागात कमिट्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांच्याद्वारे घरोघरी जाऊन मोर्चासंदर्भात जागृती केली जाणार आहे. गरज भासल्यास तालुका म. ए. समितीची बैठक या विभागांमध्ये घेतली जाणार असल्याचे आर. एम. चौगुले यांनी स्पष्ट केले.