काळा दिन फेरी यशस्वी करणार
तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार : गावागावांत केली जाणार जागृती
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषिक भूभागावर अन्याय करून कर्नाटकात डांबण्यात आले. परंतु 70 वर्षे उलटली तरी येथील नागरिकांचा लढा सुरूच आहे. न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरची लढाईही महत्त्वाची आहे. त्यामुळेच 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत बंद पाळून काळ्या दिनाची फेरी यशस्वी करण्याचा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
रविवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर होते. या बैठकीमध्ये तालुक्यातील समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या दिनाच्या जागृतीविषयी मते मांडली. दीपक पावशे म्हणाले, काळ्या दिनाची निषेध फेरी काढून मराठी भाषिक आजही आपला विरोध दर्शवत असतात. 70 वर्षे उलटली तरी लढ्याची धार कमी झालेली नाही हे काळ्या दिनाच्या फेरीतून दिसून येते. यामुळे कोणी काहीही म्हणो, पण हजारेंच्या संख्येने उपस्थित राहून मराठी भाषिक आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात निषेध व्यक्त करतात.
युवा नेते आर. एम. चौगुले म्हणाले, मराठी भाषिकांचा सनदशीर मार्गाने लढा सुरू आहे. काळ्या दिनाची होणारी फेरी ही मराठी भाषिकांसाठी महत्त्वाची आहे. यासाठी प्रत्येक गावात जागृती होण्यासोबत सीमाप्रश्नाच्या दाव्याची माहिती युवा पिढीला द्यावी लागणार आहे. यामुळेच सीमाप्रश्न घरोघरी पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनोहर संताजी, आर. के. पाटील, विठ्ठल पाटील, नितीन राजगोळकर, रामचंद्र मोदगेकर यांनी विचार मांडले. सध्या हिंदुत्वाच्या नावाखाली मराठी भाषिकांमध्ये फूट पाडली जात आहे. परंतु महाराष्ट्र एकीकरण समिती ही भगव्या ध्वजाला सर्वस्व माणूनच कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना वेगळे हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आले.
माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, काळ्या दिनाच्या फेरीसाठी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील. सध्या सुगीचे दिवस असले तरी आपल्या भाषिक अस्मितेसाठी वेळ काढला जाईल. गावोगावी जागृती व पत्रकांचे वाटप केले जाणार आहे. ज्या गावात कॉर्नर सभा घ्यायच्या असतील त्यांनी तालुका म. ए. समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. अॅड. एम. जी. पाटील यांनी आभार मानले.
बैठकीला एम. बी. गुरव, बी. डी. मोहनगेकर, मारुती लोहार, मोनाप्पा पाटील, महादेव बिर्जे, आप्पासाहेब कीर्तने, सहदेव परीट, संतोष बांडगी, शिवाजी खांडेकर, रमेश देसूरकर, सागर पाटील, नारायण सावगांवकर, मल्लाप्पा पाटील, शिवानंद कोळी, चेतन पाटील, पुंडलिक सुतार यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
