यात्राकाळात कडक बंदोबस्त ठेवू!
कंग्राळी बुद्रुक येथे श्री लक्ष्मी यात्रा पूर्वनियोजन बैठक : पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांचे ग्रामस्थांना आश्वासन
कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा तब्बल 43 वर्षांनी 28 एप्रिल ते 6 मे पर्यंत 9 दिवस भव्यदिव्य, जल्लोषात व मोठ्या धार्मिक वातावरणात होणार आहे. यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज राहणार आहे. यात्रा काळात संपूर्ण गाव गांजामुक्त करणार असून गावातील युवक मंडळे, महिला मंडळे व सर्व ग्रामस्थांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करणे सुद्धा गरजेचे आहे. गावातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनीसुद्धा देवीच्या यात्रेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, श्रद्धेने यात्रा साजरी करून आपण देवीचा आशीर्वाद घेऊया, अशी प्रत्येकाच्या मनात धार्मिक भावना असली पाहिजे, असे सहयोगाचे विचार काकती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी व्यक्त केले.
कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 28 एप्रिल ते 6 मे अशी एकूण 9 दिवस साजरी होणार आहे. सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहामध्ये यात्रा पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना उद्देशून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री लक्ष्मी यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष जयराम पाटील होते. व्यासपीठावर पी.डी.ओ. गोविंद रंग्यापगोळ, बाल संशोधन खात्याच्या अधिकारी श्रीमती सुमित्रा, कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कडोलीचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पी.डी.ओ. गोविंद रंग्यापगोळ यांनी प्रास्ताविक व स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला. पोलीस निरीक्षक शिंगे पुढे म्हणाले, कंग्राळी बुद्रुक गावची लोकसंख्या 40 हजारच्या घरात असल्यामुळे पै-पाहुणे, मित्र-मंडळींसह दररोज लाखोंच्या घरात भाविकांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी पोलीस खाते कडेकोट पहारा देणार आहे. यासाठी आम्हाला सिक्युरिटी फोर्सची मदतसुद्धा घेणे गरजेचे आहे. यात्रा पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
बस पार्किंगसाठी जागा उपलब्ध करा
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने यात्रा काळात 24 तास आरोग्य सेवा देण्याचे सांगण्यात आले. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा, बस पार्किंगसाठी आम्हाला योग्य जागा उपलब्ध करून द्या, आम्ही तुम्हाला सकाळी 7 ते रात्री 10.30 पर्यंत योग्य बससेवा पुरवू, असे सांगितले. गावची यात्रा तालुक्यामध्ये एक भव्यदिव्य होणार असल्यामुळे यात्रा काळात ग्राम पंचायत, पोलीस प्रशासन, हेस्कॉम खाते, आरोग्य खाते, परिवहन खाते यांनी योग्य सेवा देण्याचे विचार नाथाजी पाटील, अनिल पावशे, दत्ता पाटील, शंकर कोनेरी, दादासाहेब भदरगडे, प्रशांत पवार, सहदेव राजकट्टी, रवी चव्हाण, बाळू पाटील आदींनी व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक शिंगे यांच्याकडून पार्किंग झोनची पाहणी
यात्राकाळामध्ये दुचाकी, चारचाकी, बस स्टँड आदी वाहनांची पार्किंग व्यवस्था महत्त्वाची आहे. पार्किंग व्यवस्था चोख असेल तरच पै-पाहुण्यांना येऊन यात्रेचा आनंद घेण्यास अनुकूल होणार आहे. यासाठी स्वत: शिंगे यांनी श्री लक्ष्मी मंदिर, शाहूनगरच्या खाली पार्किंग करण्यासाठी जागा, यमनापूरकडून येणाऱ्या भाविकांसाठी यमनापूरजवळ पार्कींगसाठी हिंडाल्को कंपनीची जागा याची पाहणी करून जागेचे जे.सी.बी. च्या सहाय्याने सपाटीकरण करण्याचे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांना केले. बैठकीला यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, ग्रा. पं. माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यात्राकाळात विद्युत पुरवठा-पाणी असणे गरजेचे
यात्राकाळामध्ये नागरिकांना अखंड 9 दिवस अखंड वीजपुरवठा व नळांना पाणी राहणे अगदी गरजेचे आहे. यासाठी गावची मंदिरे, रथ व गदगेचा मंडप व्यतिरिक्त गावातील कोणीही नागरिकांनी आपल्या घरावर विद्युत रोषणाई करू नये. तसेच यात्रेमध्ये सर्वांना प्रखर विद्युत प्रकाश व अखंड नळांना पाणी मिळणार आहे. यासाठी नागरिकांनी याची खबरदारी देऊन त्याचे पालनही करण्याचे विचारही उपस्थितांनी व्यक्त केले.