For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कानडी वरवंट्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देऊ

11:43 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
कानडी वरवंट्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देऊ
Advertisement

मुख्यमंत्री शिंदेंचे म. ए. समिताला आश्वासन

Advertisement

बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सीमाभागात आक्रमकपणे कन्नडसक्ती राबविली जात आहे. सीमाभागातील म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली असून लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कर्नाटक सरकारच्या अत्याचारांची माहिती दिली जाणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी युवानेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सीमाभागातील दुकानांच्या फलकांवर 60 टक्के कानडी भाषेचा समावेश करावा यासाठीची दादागिरी सुरू आहे. फलक न लावणाऱ्या व्यापाऱ्यांना परवाना रद्द करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. महापालिकेचे अधिकारी स्वत: जाऊन व्यावसायिकांना दमदाटी करत मराठी भाषेतील फलक काढत आहेत.

अनगोळ येथील जय महाराष्ट्र युवक मंडळाच्या नावाचा फलकसुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस संरक्षणात काढून टाकला. तसेच डझनभर कन्नड संघटनांचे कार्यकर्ते शेकडो पोलीस घेऊन शहरभर माईकवरून व्यावसायिकांना कानडी फलक लावण्यासाठी थेट धमक्या देत फिरत आहेत. परंतु, याबाबत महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर नाराजी व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आपण आजच दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी जात आहोत. त्यावेळी कर्नाटक सरकारच्या कन्नडसक्तीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन दिले. तसेच बेळगावमध्ये कुस्ती दरम्यान ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावरून उद्भवलेल्या वादाबाबत तक्रार मुख्यमंत्री शिंदेंकडे करण्यात आली. यावेळी म. ए. समितीचे भागोजी पाटील, किरण मुतगेकर, प्रवीण रेडेकर, मनोहर हुंदरे, सचिन दळवी, निपाणी म. ए. समितीचे अच्युत माने, जयराम मिरजकर, लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, रमेश कुंभार, गणेश यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.