उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करू
नगराध्यक्षा श्रद्धा भोसलेंचे आश्वासन ; वैद्यकीय अधीक्षकांनी वेधले रिक्तपदांविषयी लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी
आधुनिक यंत्रणा आहे. परंतु फक्त भुलतज्ञ फिजिशियन नसल्यामुळे हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांना तातडीची सेवा देणे गैरसोयीचे होते. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करा, अशी मागणी सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांनी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे केली. दरम्यान याबाबत आपण प्रस्ताव द्या, वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून नक्कीच रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी भोसले यांनी दिली.
लिफ्ट उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सौ. भोसले यांचा सावंतवाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी ऐवळे म्हणाले, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नियमित स्वच्छता होणे गरजेचे आहे तसेच परिसरातील स्वच्छतेसाठी नगरपालिकेने सहकार्य करावे. त्याचबरोबर शवविच्छेदन खोलीकडे पाण्याची कमतरता आहे. त्या ठिकाणी एखादा मृतदेह विशेष केल्यानंतर साफसफाई होणे गरजेचे आहे. परंतु पाणी नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्या ठिकाणी सोयी सुविधा निर्माण करून द्याव्यात. या ठिकाणी आता पाण्याची तूर्तास समस्या मिटलेली आहे. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु हा प्रश्न तूर्तास सुटलेला आहे. तरी अन्य सर्व सुविधा देण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, असे सांगत या ठिकाणी सर्व कर्मचारी व डॉक्टर जीव तोडून काम करत आहेत. परंतु भुलतज्ञ आणि फिजिशन या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना दुसरीकडे पाठवावे लागत आहे. अत्यावश्यप्रसंगी कोणतीही शस्त्रक्रिया मनात असूनही करता येत नाही. त्यामुळे रिक्त पदे आणि ही दोन्ही पदे भरण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी यावेळी ऐवळे यांनी केली. याबाबत आपल्याला प्रस्ताव द्या, आपण निश्चितच पाठपुरावा करू, असे अभिवचन सौ. भोसले यांनी यावेळी दिले.