‘कलामंदिर’ महाविद्यालयाच्या अनुदानासाठी पाठपुरावा करू
आमदार सतेज पाटील
माजी महापौर मारूतराव कातवरे यांचा आमृतमहोत्सवी सत्कार
कातवरे कोल्हापूरच्या प्रश्नासाठी धडपडणारे कार्यकर्ते
कोल्हापूर
महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेच्या इमारतीमध्ये कलामंदिर महाविद्यालय शिप्ट करता येईल का, हे पाहू. शिवाजी विद्यापीठाशी त्याला जोडून अनुदान देता येईल का, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊ. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीबाबत मध्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.
माजी महापौर मारूतराव कातवरे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी शाहू स्मारक भवन येथे त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, मारूतराव कातवरे यांनी कुंभार समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. पुरावेळी कुंभार समाजाच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी त्यांचा नेहमी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा होता. महापौरपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याकडे मनपाला अनुदान सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्यामुळे प्रथमच मनपाला 2 कोटींचे अनुदान सुरू झाले. संत गोरा कुंभार यांचे विचार त्यांनीं येथून पुढे तेवत ठेवावे.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, कला मंदिर महाविद्यालयाला पाठबळ देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी शासकीय पातळीवर प्रयत्न केल्यास त्यांना खऱ्या अर्थाने कातवरे यांना अमृतमहोत्सवी शुभेच्छा दिल्यासारख्या ठरतील.
यावेळी अमृतकलश गौरव अंकाचे प्रकाशन झाले. अनिल घाटगे यांनी सुत्रसंचालन केले. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी आभार मानले. राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजीत घाटगे, दिलीप पवार, अॅङ महादेवराव आडगुळे, कुंभार समाजाचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रकाश कुंभार, सतीश बाचणकर आदी उपस्थित होते.
कातवरे यांचे योगदान नव्या पिढीला प्रेरणादायी
कोल्हापूरच्या जडण-घडणीसाठी अनेकांनी आयुष्य पणाला लावले. त्यापैकी एक माजी महापौर मारूतराव कातवरे आहेत. त्यांनी दिलेले योगदान नक्कीच पुढील पिढीला प्रेरणा देणार ठरेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
कोल्हापुरात जीवाला जीव देणारे कार्यकर्ते घडले
आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूरमध्ये जीवाला जीव देणारे कार्यकर्ते घडले. यामध्ये माजी महापौर मारूतराव कातवरे यांचा समावेश होतो. त्यांना समाजसेवेचा ‘वेडा’ कुंभार असे म्हणावे लागेल. कोल्हापुरात असे रत्न झाले याचा आपणास सार्थ अभिमान आहे.
प्रामाणिक कार्यकर्ते भेटणे मुश्कील
पूर्वी प्रामाणिक कार्यकर्ते होते. आता मात्र, स्थिती बदलली आहे. सकाळी भेटणारा कार्यकर्ता, संध्याकाळी आपल्यासोबत असेल, याची शाश्वती नाही, असा खोचक टोला आमदार पाटील यांनी लगावला.
मारूतराव कातवरे भावुक
सत्कारला उत्तर देताना कातवरे डॉ. डी. वाय. पाटील, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या आठवणांना उजाळा देत असताना भावुक झाले. कुंभार समाजाच्या प्रश्नासाठी सतेज पाटील यांनी 24 तासात अध्यादेश काढल्याचेही त्यांनी सांगितले.