केंद्र-राज्य समन्वयातून प्रलंबित प्रकल्प मार्गी लावू
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
त.भा. प्रतिनिधी
पणजी : राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले अनेक केंद्रीय प्रकल्प गोव्यात सुरू आहेत. प्रलंबित प्रकल्प हे केंद्र आणि राज्य यांच्या समन्वयातून मार्गी लावले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गोव्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आणि विविध विभागांमधील परस्पर समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, सोमवारी पर्वरी मंत्रालयात केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, 27 केंद्रीय विभागांचे प्रमुख आणि विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत 512.91 कोटींच्या सुविधांना मंजुरी
केंद्र सरकारच्या ‘राज्यांना विशेष भांडवली गुंतवणूक साहाय्य’ योजनेअंतर्गत गोव्यात सुरू असलेल्या 512.91 कोटी रुपयांच्या प्रमुख पायाभूत विकासकामांच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. या निधीचा योग्य वापर आणि कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांना गती :
गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग, कनेक्टिव्हिटी रस्ते आणि रेल्वेच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत केंद्रीय यंत्रणांसोबत सविस्तर चर्चा झाली. आंतरविभागीय समन्वयाअभावी रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अंमलबजावणी विभागांना दिले.
एकत्रित ‘केंद्रीय सचिवालय‘ उभारणी
गोव्यात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेली केंद्र सरकारची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी गोव्यात एक अद्ययावत ‘केंद्रीय सचिवालय’ उभारण्याबाबत बैठकीत चाचपणी करण्यात आली, ज्यामुळे प्रशासकीय कामे अधिक सोयीची होतील.