For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नष्ट करणार इस्रायलचे अस्तित्व

06:27 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
नष्ट करणार इस्रायलचे अस्तित्व
Advertisement

इराणकडून प्रक्षोभक घोषणा, वातावरणात तणाव

Advertisement

► वृत्तसंस्था/ तेहरान

‘इस्रायलचा अंतकाळ जवळ आला आहे. हा देश आता अखेरचा श्वास घेत असून येत्या 25 वर्षांमध्ये तो पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट झालेला दिसून येईल,’ अशी धमकी इराणने दिली आहे. त्यामुळे आधीच तापलेल्या मध्यपूर्वेतील तणावात आणखी भर पडली आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजतबा खमेनेई यांनी ही धमकी दिली असून त्यांनी अमेरिका आणि आखातातील इतर देश यांनाही इशारा दिला आहे. अमेरिकेला आता आखातातील कोणताही देश सुरक्षित आसरा देऊ शकणार नाही, अशीही भाषा मोजतबा खमेनेई यांनी मंगळवारी केली आहे.

Advertisement

तीन महिन्यांपूर्वी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात खमेनेई गंभीर जखमी झाल्याचे वृत्त होते. त्यांच्या एका पायाला गंभीर इजा झाली असून ते हालचाल करण्याच्या परिस्थितीत नाहीत. ते एका गुप्त जागी असून तेथे सहकाऱ्यांच्या साहाय्याने ते जीवन व्यतीत करत आहेत, असेही बोलले जात आहे. मंगळवारी त्यांनी त्यांच्या टेलिग्राम खात्यावरुन हा इशाऱ्याचा संदेत अमेरिकेला दिला आहे.

हल्ल्यानंतर इशारा

अमेरिकेने सोमवारी मध्यरात्रीनंतर इराणच्या काही क्षेपणास्त्र निर्मिती स्थानांवर आणि होर्मुझ सामुद्रधुनीत पाणसुरुंग स्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणच्या युद्धनौकांवर युद्धविमाने आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ला केला. त्यानंतर काही तासातच खमेनेई यांनी अमेरिका आणि इस्रायलला हा इशारा दिला आहे. अद्याप अमेरिकेच्या हल्ल्याला इराणने कृतीने उत्तर दिलेले नाही. तथापि, त्यांच्या संदेशामुळे तणावात भर पडली असून युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिका सैतान, इस्रायल पाळीव प्राणी

आपल्या संदेशात खमेनेई यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषा उपयोगात आणली आहे. अमेरिका हा सैतान असून इस्रायल हा अमेरिकेने पाळालेले जनावर आहे. इराणची शूर सेना हा सैतान आणि त्याचे जनावर यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आमची सेना अल्लावर विश्वास ठेवणारी आहे. भूमी, आकाश आणि समुद्र अशा तिन्ही मार्गांनी आम्ही आमची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांच्या साहाय्याने सैतान आणि त्याचे जनावर यांना सळो की पळो करुन सोडत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी इराणच्या सैनिकांच्या पराक्रमाची प्रशंसा संदेशात केली आहे.

अमेरिकेचा दबदबा होईल नष्ट

अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील अनेक सेना आस्थापनांवर इराणने गेल्या तीन महिन्यांमध्ये हल्ला चढविला आहे. ही आस्थापने आखातातील अनेक मुस्लीम देशांमध्ये आहेत. ती आम्ही नष्ट केल्याने आखाती देशांमध्ये आता अमेरिकेला कोणीही जागा देणार नाहीत. येथे अमेरिकेला सुरक्षित स्थान मिळणार नाही, हे आम्ही सुनिश्चित केले आहे. इतर आखाती देशांनाही यामुळे धडा मिळाला आहे. ते अमेरिकेला आश्रय देणार नाहीत, असे प्रतिपादनही या संदेशात केले गेले आहे.

Advertisement
Tags :

.