For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीपाद नाईकना हरवणारच!

11:46 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीपाद नाईकना हरवणारच
Advertisement

अॅड. रमाकांत खलप यांचा निर्धार : दोन्ही ठिकाणी काँग्रेसचाच विजय : पाटकर,माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांचा काँग्रेस प्रवेश

Advertisement

पणजी : कालपर्यंत मी आणि श्रीपाद नाईक मित्र होतो. तेथे राजकारण नव्हते. आज आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण श्रीपाद नाईकांचा पराभव करणारच असे निर्धारपूर्वक वक्तव्य काँग्रेसचे उत्तर गोवा उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी केले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवारी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पणजी काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी दक्षिण गोवा उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, अॅड. कार्लुस फरेरा, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. उमेदवारी जाहीर होण्यास उणापूरा महिन्याभराचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे आता प्रचारास केवळ 30 दिवसच मिळणार आहे. मात्र असे असले तरी कोणताही फरक पडणार नाही, परिणाम जाणवणार नाही. राज्यात सरकार भाजपचे असले तरी गोमंतकीयांच्या हृदयात आजही काँग्रेसच आहे. त्यामुळे बहुमताने लोक काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करतील, असा दावा अॅड. खलप यांनी केला. काँग्रेसमध्ये कोणत्याही अंतर्गत दुफळ्या, हेवेदावे नाहीत, धुसफूस नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसशी प्रतारणा करून भाजपमध्ये गेलेल्यांची आज तेथे गोची झाली आहे. त्यापैकी काहीजणांवर तर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ते स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने काहींनी संपर्कही केला असल्याचे श्री. पाटकर यांनी सांगितले.

गोव्यासाठी हा दुसरा जनमतकौल : गिरीश

Advertisement

ही लोकसभा निवडणूक म्हणजे गोव्यासाठी दुसरा जनमतकौल आहे. कारण येथील जनता राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारांच्या कारभाराला कंटाळलेली आहे. त्यामुळेच गोव्याची स्वतंत्र ओळख टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा जनमत कौल घेण्याची गरज आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून गोमंतकीय जनता तो कौल देईल व काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला.

सर्वांची नाराजी दूर : पाटकर

काँग्रेसने खलप यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे पक्षाचे सरचिटणीस विजय भिके यांनी नाराजी व्यक्त केली आहे का? असे विचारले असता, शनिवारी सकाळीच आपण त्यांची भेट घेऊन नाराजी दूर केली असल्याचे पाटकर यांनी सांगितले. भिके हे गत सुमारे 27 वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडे संबंधित आहेत. यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पक्षाचे ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांची नाराजी दूर झाली आहे, असे पाटकर म्हणाले.

दोन्ही उमेदवार विजयी होतील : युरी

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उत्तर आणि दक्षिणेत दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवारच विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. हे दोन्ही नेते संसदेत गोव्याचा आवाज उठवतील आणि गोव्याच्या अस्मितेचे संरक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न करतील, असे सांगून त्यांनी अॅड. खलप आणि विरियातो यांचे अभिनंदन केले.

एलिना साल्ढाणांचा काँग्रेस प्रवेश

या पत्रकार परिषदेदरम्यान गत भाजप सरकारमध्ये मंत्रीपदी राहिलेल्या माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला. पक्षाध्यक्ष अमित पाटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा केली. त्यावेळी बोलताना काँग्रेसचे दोन्ही उमेदवार जाहीर झाल्यानंतरच आपण हा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. विद्यमान सरकार पूर्णत: धनदांडग्या उद्योजकांच्या खिशात गेले असून त्यांच्या फायद्यासाठी स्थानिक नागरिकांचे विरोध डावलून रेल्वे डबल ट्रेकिंगसारखे कित्येक प्रकल्प सक्तीने त्यांच्या माथी मारत आहेत, असे त्या म्हणाल्या. या प्रकल्पांना आपण जीव तोडून विरोध करत असून आता काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने आपले हे कार्य पुढे नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन्ही जागांवर निर्विवाद यश मिळवू

काँग्रेस पक्ष हा तळागाळातील सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. या ठिकाणी कार्यकर्ते व नेते यांचे नाते हे अतूट आहे. तरीही विरोधकांकडून काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नाराजी असल्याचे मुद्दामहून सांगितले जाते. हा केवळ बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. परंतु काँग्रेसमध्ये सर्व नेते व कार्यकर्ते एकदिलाने हातात हात घालून गोव्यातील दोन्ही जागांवर पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार आहेत. विरोधकांनी कितीही काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी जनता काँग्रेसच्या पाठिशी राहणार आहे. दक्षिण व उत्तरेतील दोन्ही जागांवर काँग्रेस निर्विवाद यश मिळवेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

Advertisement
Tags :

.