For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरजीच्या उमेदवारीवरच आगामी निवडणूक लढणार

03:18 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरजीच्या उमेदवारीवरच आगामी निवडणूक लढणार
Advertisement

आमदार विरेश बोरकर यांचे स्पष्ट निवेदन : भाजपवर जोरदार हल्ला

Advertisement

पणजी : आपण रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षासोबत असून आगामी विधानसभा निवडणूक त्याच पक्षाच्या उमेदवारीवर लढणार आहे, असे निवेदन पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनी केले असून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, असेही स्पष्ट केले.  मनोज परब यांचा राजीनामा, पक्षातील वाद आणि इतर पक्षीय प्रकरणांबाबत त्यांच्यावर पत्रकारांनी विविध प्रश्नांची सरबत्ती केली. तथापि त्यांना उत्तरे देण्याचे बोरकर यांनी टाळले आणि पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच भाष्य करू असे त्यांनी स्पष्ट केले. पर्वरी विधानसभा संकुलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोरकर बोलत हेते. ते पुढे म्हणाले की, मनोज परब हे आपले नेते असून त्यांचा आदर करतो. त्यांच्या राजीनाम्याने दु:ख झाले असून ते आपल्या ह्रदयात आहेत. आपण लवकरच पक्ष कार्यालयास भेट देणार असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बोलणी करणार आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असून आपली बाजू त्यांच्यासमोर मांडणार आहे, असे ते म्हणाले.

भाजपवर जोरदार हल्ला

Advertisement

मागील विधानसभा अधिवेशन फोंडा पोटनिवडणुकीचे निमित्त करून गुंडाळण्यात आले. कोणतीही चर्चा न करता अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. हे सरकार मनमानी करणारे, भ्रष्टाचारी असल्याचा आरोप बोरकर यांनी करून भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

त्या विधेयकांवर चर्चा करावी

आरजी पक्षातर्फे एकूण 6 विधेयके विधानसभेत मांडणार होतो. तथापि ती मांडता आली नाहीत व त्यावर चर्चाही होऊ शकली नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशन लवकर बोलवावे आणि त्या सहा विधेयकांवर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली. गोवा राज्य आणि गोमंतकीय जनतेसाठी ती विधेयके महत्त्वाची आहेत. सांत आंद्रे मतदारसंघातील अनेक कामे रखडली असून त्यांना सरकार न्याय देत नाही. उलट फक्त खोटी आश्वासने देण्यात येतात, असे ते म्हणाले.

आमदार विरेश बोरकर म्हणाले...

  • आरजी पक्षात ज्या काही घडामोडी झाल्या त्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टी आहेत. ती पक्षातील लोकशाही आहे.
  • पक्ष कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही. पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षपदाची निवडणूक होणे आवश्यक आहे.
  • आरोग्यामुळे आपण गोव्याबाहेर होतो. पत्रकारांसह अनेकांनी आपणास केलेले  फोन आपण घेऊ शकलो नाही, दिलगिरी व्यक्त करतो.
Advertisement
Tags :

.