शंभूराजांचे भव्य स्मारक उभारू
संगमेश्वर, देवरुख :
हिंदू धर्माचे रक्षण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे. कसबा येथे इतिहासाचे साक्ष देणारे संभाजी राजांचे भव्य स्मारक लवकरच उभे राहील. त्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा वेळोवेळी केला जाईल. लागेल तेवढा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून दिला जाईल. जगभरातील लोक येथे येवून शंभूराजेंना नतमस्तक होतील, असे भव्य स्मारक आम्ही येथे उभारू, असे प्रतिपादन मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी कसबा येथील कार्यक्रमा प्रसंगी केले.
छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समितीच्या वतीने कसबा शास्त्रीपूल याठिकाणी संभाजी महाराज बलिदान दिन कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री राणे बोलत होते. संभाजी महाराजांच्यामुळे आपण आज हिंदू म्हणून स्वत:ची ओळख सांगू शकतो. आपल्या नावापुढे जी हिंदू आडनावं लागलीत ती संभाजी महाराजांमुळेच असे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. मी हिंदू म्हणून व्यासपीठावर उपस्थित आहे. हिंदु समाजाने महायुतीचे सरकार आणले आहे. हिंदु समाजाचे संरक्षण सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे. कसबा येथे शंभुराजांचे स्मारक उभारणे महाविकास आघाडी सरकारला जमले नाही. परंतु हिंदुत्ववादी महायुती सरकारच्या कालावधीत स्मारकाचे काम पूर्णत्वास जाईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
- औरंगजेबाच्या कबरीचा करेक्ट कार्यक्रम करू
औरंगजेबाच्या कबरीचा एक दिवशी करेक्ट कार्यक्रम केला जाईल. तारीख अथवा वेळ घोषित न करता प्रथम करेक्ट कार्यक्रम व नंतर प्रसिद्धी असे राणे यांनी स्पष्ट केले. हिंदू धर्माची बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम विरोधकांनी हाती घेतला आहे. धर्माच्या रक्षणासाठीं प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे. आपल्या राजांना अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडले पाहिजे. प्रत्येक हिंदू सण अभिमानाने साजरे करणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर आमदार शेखर निकम, प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार, सदानंद चव्हाण, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, राजेंद्र महाडिक, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम, मालोजी घोरपडे यांचे वंशज आदी उपस्थित होते.
- इतिहास साक्ष देईल असे स्मारक उभे राहील - शेखर निकम
आमदार निकम म्हणाले, संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. कसबा येथे इतिहास साक्ष देईल, असे स्मारक नक्कीच उभे राहील. कसबा ते शृंगारपूर हा रस्ता चांगल्या प्रकारे तयार करून परिसरातील पुरातन वास्तू ही विकसित करणे गरजेचे आहे. यामुळे कोकणात पर्यटनाला चालना मिळेल. तसेच ऐतिहासिक वारसा देखील जपला जाईल.
- न भुतो न भविष्यती स्मारक उभे राहिले पाहिजे
जठार म्हणाले, ज्याठिकाणी महाराजांनी लढाई केली त्याठिकाणी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे अशी इच्छा होती. या मागणीला महायुती सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. 11 मार्च संभाजी महाराजांचा स्मरण दिन असून तो दिवस कधीही विसरणार नाही. दरवर्षी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृर्तींना उजाळा दिला जाईल. आमदार लाड म्हणाले, न भुतो न भविष्यती असे स्मारक उभे राहिले पाहिजे. हे स्मारक पाहण्यासाठी जगभरातून शंभूप्रेमी याठिकाणी येतील नतमस्तक होतील. स्मारकाबरोबर रस्ते व इतर व्यवस्था उभी करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
- ‘छत्रपती संभाजी महाराज यांची अलौकीक गाथा’ कार्यक्रम
या कार्यक्रमानंतर शास्त्री पूल ते संभाजी स्मारक अशी पदयात्रा काढण्यात आली. वारकरी दिंडी यामध्ये सहभागी झाली होती. शंभूराजे महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पूर्वी शास्त्रीपूल येथे कार्यक्रमस्थळी ‘छत्रपती संभाजी महाराज यांची अलौकीक गाथा’ हा कार्यक्रम शिवपाईक प्रा. योगेश माणिकराव चिकटगावकर व सहकाऱ्यांनी सादर केला. यामध्ये संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत, पोवाडा सादर केला. तसेच शिवकालीन गेंधळ, शिवकालीन पिंगळा, कर पल्लवी कला, वासुदेव व मर्दानी दांडपट्टा पेश केला. रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात सादरीकरणाला दाद दिली. सूत्रसंचालन भाजपा चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अमित ताठरे, सतीश पटेल, विनोद म्हस्के, रुपेश कदम, स्वप्नील सुर्वे, मिथुन निकम, अविनाश गुरव यांसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.