For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासबाग आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांसाठी आरेखान करणार

10:25 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
खासबाग आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांसाठी आरेखान करणार
Advertisement

मनपा आयुक्तांची अधिकाऱ्यांना सूचना : नगरसेवक रवी साळुंखे यांच्या प्रयत्नांना यश

Advertisement

बेळगाव : खासबाग येथील आठवडी बाजाराला शिस्त लावण्यासाठी पोलीस खात्याबरोबरच आता महानगरपालिकेदेखील पुढे सरसावली आहे. शुक्रवारी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत दर रविवारी भरणाऱ्या खासबाग आठवडी बाजाराचा फेरफटका मारून पहाणी केली. तसेच भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी आरेखन करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली. येत्या रविवारपासून बाजारपेठेला शिस्त लागणार असून त्यामुळे वाहतूक समस्येसह मोबाईल चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे. खासबाग येथील रविवारच्या आठवडी बाजाराला मोठी परंपरा आहे. शहरासह तालुका आणि विविध भागातून शेतकरी त्या ठिकाणी भाजीपाला व इतर साहित्य विक्री करण्यासाठी घेऊन येतात.

रविवारी सकाळपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्याही लक्षणीय असते. मात्र भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी व्यवस्थितरित्या जागा मिळत नाही. तर काहीजण मनमानी पद्धतीने बसून व्यवसाय करतात. परिणाम वाहतूक कोंडी होण्यासह स्थानिक रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. गर्दीचा फायदा उठवत भुरट्या चोरट्यांकडून नागरिकांचे मोबाईल पळविण्याची घटनाही वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेवक रवी साळुंखे यांनी खासबाग आठवडी बाजाराला शिस्त लावण्यासाठी पोलीस आणि महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी यापूर्वी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत केली होती.

Advertisement

त्यानुसार अलिकडेच रहदारी पोलिसांनी खासबाग आठवडी बाजाराला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. पोलीस खात्याकडून आवश्यकते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. या पाठोपाठ शुक्रवारी दुपारी 1 च्या दरम्यान मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत खासबाग बाजारपेठेला भेट दिली. पाहणी दौरा करून तेथील नागरिकांकडून समस्या ऐकून घेतल्या. नगरसेवक रवी साळुंखे यांनी बाजारपेठेला शिस्त लागावी यासाठी भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी आरेखन करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहतूक केंडीची समस्या निर्माण होणार नाही. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही सोयीस्कर होईल. असे सांगितल्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना भाजी विकेत्यांना बसण्यासाठी आरेखन करून देण्याची सूचना केली.

त्याचबरोबर दर रविवारी परिसरात मोबाईल टॉयलेटदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महापालिकेने नियुक्त केलेला भूभाडे वसुली ठेकेदारदेखील यावेळी उपस्थित होता. गेल्या अनेक वर्षांपासून खासबाग आठवडी बाजाराला शिस्त लावण्यासाठी नगरसेवक रवी साळुंखे यांच्याकडून सुरु असलेल्य प्रयत्नांना अखेर यश आले असून याबद्दल नागरिक व भाजी विक्रेत्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Advertisement
Tags :

.