नेटिशीला उत्तर देण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे वेळ मागणार : शिवकुमार
बेंगळूर : नॅशनल हेराल्ड प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी मी वेळ मागणार आहे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. सोमवारी दिल्लीतील कर्नाटक भवन येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मी सोमवारी दिल्ली पोलिसांना उत्तर देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पक्षातील ज्येष्ठ आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर मी विशेष विमानाने दावणगेरेला जात आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर नोटिशीला उत्तर देण्यासाठी वेळ मागणार आहे, असे ते म्हणाले. प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी नोटिशीला उत्तर देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी माझ्या उत्तराची प्रत प्रसारमाध्यमांसाठी जाहीर करेन. कारण दिल्ली पोलिसांनी नोटिशीला एफआयआरची प्रत जोडलेली नाही. आम्ही याआधीच ईडीला उत्तर दिले आहे. एफआयआरच्या प्रतीत काय आहे, हे मी वाचलेले नाही. दिल्ली पोलिसांनी फक्त नोटीस बजावली आहे. एफआयआरची प्रत देण्याची विनंती करेन, असे ते म्हणाले.